‘डीआरडीओ’, ‘इस्रो’ मदतीला; भविष्यातील संकटे टाळण्याचे नियोजन

‘डीआरडीओ’, ‘इस्रो’ मदतीला; भविष्यातील संकटे टाळण्याचे नियोजन

डेहराडून - उत्तराखंडमध्ये भविष्यात अशाप्रकारची संकटे येऊ नयेत म्हणून राज्य सरकारने वेगाने पावले उचलायला सुरुवात केली आहे. या मोठ्या हिमस्खलनाचा सर्व अंगाने विचार केला जाणार असून भविष्यात अशाप्रकारची स्थिती निर्माण होऊ नये म्हणून देखील उपाययोजना आखण्यात येतील असे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांनी  सांगितले. 

सध्या या भागातील लोकांना अन्न आणि अन्य जीवनोपयोगी साहित्याचा पुरवठा करण्यावर यंत्रणेचा भर असल्याचे त्यांनी सांगितले. हिमकडा कोसळल्याने ही दुर्घटना घडल्याचे प्राथमिक कारण समोर आले आहे, मुख्य सचिव या सगळ्या घटनेचा सविस्तर अभ्यास करत असून त्यांना नेमकी कारणे शोधण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सध्या दोनशे लोक बेपत्ता असून अकराजणांचे मृतदेह हाती लागले आहेत. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) या आपत्तीचे मूळ कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेकडे (इस्रो) देखील आम्ही मदत मागितली आहे, असे रावत यांनी सांगितले. आधी या दुर्घटनेची मूळ कारणे शोधण्यात येतील आणि त्यानंतर भविष्यामध्ये अशा प्रकारच्या दुर्घटना घडू नयेत म्हणून नियोजन आखले जाईल, असेही रावत यांनी सांगितले. सध्या आमचा भर हा लोकांचे जीव वाचविण्याबरोबरच त्यांचे पुनर्वसन कसे होईल, यावर आहे. अनेक संस्था सध्या मदत आणि बचाव कार्यामध्ये सहभागी झाल्या आहेत, असे त्यांनी नमूद केले.

कामगारांसाठी मोबाईल ठरला तारणहार
जोशीमठ ः उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात तपोवन येथील बोगद्यामध्ये अडकून पडलेल्या कामगारांसाठी मोबाईल तारणहार ठरला. या महासंकटानंतर बोगद्यातील मजुरांनी आपण जिवंत राहू, ही आशाच सोडून दिली होती पण अचानक एका मजुराला आपल्या मोबाईलला रेंज येत असल्याचे दिसून आले, यानंतर त्याने दूरध्वनीवरून अधिकाऱ्यांशी संपर्क साधला परिणामी त्याच्यासह सहकाऱ्यांची सुखरूप सुटका करण्यात यंत्रणेला यश आले. हिमकडा तुटल्यानंतर प्रचंड वेगाने पाणी खाली कोसळले. काही लोक आम्हाला बाहेर पडण्यासाठी हाका मारीत होते पण काही समजायच्या आत क्षणार्धात हा सगळा जलप्रपात आमच्या अंगावर कोसळला, असे या बोगद्यातून सुखरूप सुटका करण्यात आलेला कामगार लाल बहाद्दूर याने वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. 

म्हणून झाली सुटका
ज्यावेळी या बोगद्यामध्ये पाणी शिरले तेव्हा आम्ही तीनशे मीटर खोलीवर काम करत होतो. अचानक पाण्याच्या प्रपाताने वेढल्यानंतर आम्ही जिवंत राहण्याची आशाच सोडून दिली होती, पण आमच्यातील एका सहकाऱ्याच्या मोबाईलला रेंज असल्याचे दिसून आले. यानंतर आम्ही प्रकल्पाच्या व्यवस्थापकांशी संपर्क साधला. पुढे त्यांनीच आमची सुटका केल्याचेही लाल बहाद्दूर यांनी सांगितले.

तपोवन प्रकल्पाचे दीड हजार कोटींचे नुकसान
उत्तराखंडमधील हिमस्खलनात एनटीपीसीच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या ४८० मेगावॉटच्या तपोवन- विष्णुगड जलविद्युत प्रकल्पाचे दीड हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. हा प्रकल्प २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचा यंत्रणेचा विचार होता पण या संकटामुळे ही डेडलाइन गाठता येणे शक्य नसल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. सध्या या प्रकल्पाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गाळ साचला असून त्याला लवकर हटविणे शक्य नसल्याचे केंद्रीय ऊर्जामंत्री आर.के. सिंग यांनी सांगितले. ऊर्जामंत्र्यांनी आज प्रत्यक्ष घटनास्थळाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com