धोकादायक खलिस्तानी म्होरक्‍या तुरुंगातून पसार

वृत्तसंस्था
रविवार, 27 नोव्हेंबर 2016

सिंग याच्याबरोबर पळालेल्या अन्य चार जणांची नावे गुरप्रीत सिंग, विकी गोंद्रा, नितीन देओल आणि विक्रमजित सिंग विकी अशी आहेत. सिंग याला 2014 मध्ये करण्यात आलेली अटक हे पंजाबमधील दहशतवादविरोधी मोहिमेचे अत्यंत मोठे यश मानले जात होते.

पटियाला - पंजाबमधील नाभा येथील तुरुंगावर 10 हल्लेखोरांनी हल्ला चढवित खलिस्तान लिबरेशन फोर्सचा (केएलएफ) कुख्यात म्होरक्‍या हरमिंदर सिंग उर्फ मिंटू आणि इतर चार कैद्यांना मुक्‍त केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांच्या वेशात आलेल्या या हल्लेखोरांनी या तुरुंगावर जोरदार गोळीबार करत सिंग व इतर चार जणांसमवेत पलायन केले. आज सकाळी सुमारे साडेआठच्या सुमारास ही घटना घडली.

सिंग याच्याबरोबर पळालेल्या अन्य चार जणांची नावे गुरप्रीत सिंग, विकी गोंद्रा, नितीन देओल आणि विक्रमजित सिंग विकी अशी आहेत. सिंग याला 2014 मध्ये करण्यात आलेली अटक हे पंजाबमधील दहशतवादविरोधी मोहिमेचे अत्यंत मोठे यश मानले जात होते. सिंग व त्याचा साथीदार गुरप्रीत सिंग उर्फ गोपी या दोघांना नोव्हेंबर 2014 मध्ये नवी दिल्ली येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक करण्यात आली होती. याशिवाय, त्याच्या इतर दोन साथीदारांना थायलंडमध्ये अटक करण्यात आली होती.

केएलएफच्या या म्होरक्‍याचा किमान 10 दहशतवादी कृत्यांमध्ये सहभाग असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. गोपी या त्याच्या साथीदारास 2013 मध्ये हिंदु नेत्यांना ठार मारण्याचे काम सोपविण्यात आले होते. मात्र पोलिसांनी हा कट उधळून लावला होता.

सिंग याचे पाकिस्तानची कुप्रसिद्ध गुप्तचर संस्था असलेल्या आयएसआयशीही संबंध असल्याचे निष्पन्न झाले होते. दरम्यान, या कैद्यांना पुन्हा अटक करण्यासाठी पंजाबमध्ये मोठी शोधमोहिम हाती घेण्यात आली आहे.

Web Title: dreaded Sikh militant fled after jail break