'चमकी'मुळे दगावले आणखी 14 बालक; मृत्यूंची संख्या 132 वर

उज्ज्वलकुमार
गुरुवार, 20 जून 2019

बिहारमध्ये चमकी तापाचे थैमान सुरूच असून आज मुझफ्फरपूरमध्ये आणखी चार मुलांचा यामुळे मृत्यू झाला, यामुळे आतापर्यंत मरण पावलेल्या मुलांची संख्या 132 वर पोचली आहे.

पाटणा : बिहारमध्ये चमकी तापाचे थैमान सुरूच असून आज मुझफ्फरपूरमध्ये आणखी चार मुलांचा यामुळे मृत्यू झाला, यामुळे आतापर्यंत मरण पावलेल्या मुलांची संख्या 132 वर पोचली आहे. मुझफ्फरपूरलाच लागून असलेल्या अन्य जिल्ह्यांमध्येही या तापाचे थैमान कायम असून आज शेकडो मुले विविध रुग्णालयांत उपचारासाठी दाखल झाली होती. दरभंगा, बेगुसरायमधील अतिरिक्त डॉक्‍टरांची कुमक मुझफ्फरपूरला पाठविण्यात आली असून, हे डॉक्‍टर मुलांची देखभाल करत आहेत. 

दरम्यान, राज्यातील उष्णतेचा प्रकोपही कायम असून आज पुन्हा विविध भागांमध्ये चौदाजणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये औरंगाबाद, नवादा आणि गया येथील स्थानिक नागरिकांचा समावेश आहे. उष्णतेच्या लाटेमुळे आतापर्यंत 316 जण मरण पावले असून, गयेतील रुग्णालयांमध्ये दोनशेजणांवर उपचार सुरू आहेत. तत्पूर्वी मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी मंगळवारी विविध रुग्णालयांना भेट देत पाहणी केली होती. मुख्यमंत्र्यांनी पाठ फिरविताच अनेक ठिकाणच्या रुग्णालयांमधील परिस्थिती जैसे थे झाल्याचे सूत्रांनी सांगितले. प्रशासनाच्या या बेपर्वाईविरोधात पाटणा उच्च न्यायालयामध्ये एक जनहित याचिका दाखल करण्यात आली असून, येथील स्थानिक विधिज्ञ सुधीरकुमार ओझा यांनी ही याचिका दाखल केली आहे, यामध्ये त्यांनी चमकी तापाचा प्रतिबंध करण्यात सरकार आणि प्रशासन दोन्ही अपयशी ठरल्याचा आरोप केला आहे. 

उपचारासाठी तज्ज्ञांची समिती नेमा 
नवी दिल्ली : चमकी तापाने पीडित मुलांच्या उपचारासाठी केंद्र सरकारला तातडीने आरोग्यतज्ज्ञांची समिती नेमण्यासंदर्भात निर्देश द्यावेत, अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने आज तयारी दर्शविली. न्या. दीपक गुप्ता आणि न्या. सूर्यकांत यांच्या सुटीकालीन पीठासमोर याचिकाकर्त्याच्या वकिलाने याप्रकरणी लवकर सुनावणी घेण्याची विनंती केली. त्यानुसार ही विनंती मान्य करीत याचिकेवर 24 जून रोजी सुनावणी घेण्याचे निश्‍चित करण्यात आले. ऍड. मनोहर प्रताप यांनी ही याचिका दाखल केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Due to Chamaki 14 more children killed The number of deaths is 132