एफडीएच्या कारवाईच्या धास्तीने गोव्यातील मासळी व्यवसाय ठप्प

Due to FDA action fish farming in Goa stops
Due to FDA action fish farming in Goa stops

मडगाव : फाॅर्मेलीन प्रकरणानंतर अन्न व औषध प्रशासनाकडून (एफडीए) कडक नियम लादण्यात आल्याने गोव्यातील मासळी व्यवसायावर मोठा परिणाम झाला असून गेले दोन दिवस मासळीची आवक घटल्याने टंचाई निर्माण झाली आहे. मासेप्रेमींसह हाॅटेल व्यावसियक, घाऊक व किरकोळ मासळी विक्रेते, फिरते मासळी विक्रेते आदी व्यावसायिकांना याचा जबर फटका बसला आहे. 

गोव्याची मुख्य मासळी बाजारपेठ असलेल्या मडगावमध्ये दिवसाकाठी सरासरी 65 टन आवक होते. आज केवळ तीन टन मासळीची आवक झाली. त्यामुळे घाऊक मार्केटमधील व्यवहार जवळपास ठप्प झाला. महाराष्ट्रातून मासळीची दोन वाहने तेवढी मार्केटात आज दाखल झाली. तर काही प्रमाणात स्थानिक मच्छीमारांकडून मासळी पुरवण्यात आली अशी माहिती मासळीचे एजंट कांता नाईक यांनी दिली. 

एफडीएकडे नोंदणी न केलेल्या व इन्सुलेटेड (उष्णतारोधक व्यवस्था) नसलेल्या इतर राज्यांतील मासळीच्या वाहनांना गोव्याच्या सीमेवर अडवून परत पाठवण्याची कारवाई सध्या सुरु आहे. त्याच बरोबर पालिकेचा व्यापार परवाना न मिळवलेल्या मडगावच्या घाऊक मासळी विक्रेत्यांचे नोंदणी प्रमाणपत्र एफडीएने रद्द केले आहे. एफडीएकडून कारवाई होण्याची धास्ती असल्याने या मासळी विक्रेत्यांनी इतर राज्यांतून मासळीची आयात न करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आज मडगावच्या घाऊक मासळी मार्केटात आवक झाली नाही. 

मडगावच्या घाऊक मार्केटात या हंगामात महाराष्ट्र व कर्नाटक येथून मासळीची आवक होते. एफडीएच्या कारवाईचा फटका या दोन्ही राज्यांतील मासळी व्यावसायिकांनाही बसला आहे. एफडीएकडे नोंदणी न केलेली व इन्सुलेटेट नसलेली वाहने गोव्याच्या सीमेवरून माघारी पाठवण्यात येत असल्याने या मासळी व्यावसियाकांचेही नुकसान होत आहे. कर्नाटक व महाराष्ट्रातून पाचशे किलोमीटरपेक्षा कमी अंतरावरून मासळी येत असल्याने तेथील वाहने इन्सुलेटेड असण्याची आवश्यकता नाही अशी भूमिका मडगाव घाऊक मासळी विक्रेता संघटनेने घेतली आहे. एफडीएने मासळी तपासणीसाठी मडगावच्या घाऊक मार्केटात प्रयोगशाळा सुरु करण्यास त्वरित पावले न उचलल्यास 1 नोव्हेंबरपासून इतर राज्यांतील मासळीची आयात बंद करण्याचा इशारा या संघटनेने दिला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com