सूत टंचाईमुळे निपाणी परिसरातील यंत्रमाग बंद अवस्थेत

विकास पाटील
रविवार, 12 ऑगस्ट 2018

निपाणी - गेल्या 20 दिवसापासून सुत टंचाई सुरु झाल्याने येथील औद्योगिक वसाहतीसह परिसरातील यंत्रमाग व्यवसाय पुन्हा अडचणीत सापडला आहे. त्यामुळे परिसरातील आठ यंत्रमाग कारखाने सध्या बंद आहेत. त्यामुळे उद्योजकासह  मजूरही आर्थिक अडचणीत आले आहेत.

निपाणी - गेल्या 20 दिवसापासून सुत टंचाई सुरु झाल्याने येथील औद्योगिक वसाहतीसह परिसरातील यंत्रमाग व्यवसाय पुन्हा अडचणीत सापडला आहे. त्यामुळे परिसरातील आठ यंत्रमाग कारखाने सध्या बंद आहेत. त्यामुळे उद्योजकासह  मजूरही आर्थिक अडचणीत आले आहेत. या व्यवसायाला चांगले दिवस येण्यासाठी गेल्या तीन वर्षापासून संघर्ष सुरु असला तरी केवळ आश्‍वासनेच मिळाली आहेत. त्यामुळे वस्त्रोद्योगाची परिस्थिती धोक्‍यात आली आहे. 

येथे उत्पादित होणारा संपूर्ण माल हा महाराष्ट्रातील सुताची बाजारपेठ म्हणून नावलौकीक मिळविलेल्या इचलकरंजी सूत बाजारात पाठविला जातो. या व्यवसायावर अनेक उद्योजकासह मजुरांचा उदरनिर्वाह सुरु आहे. पण प्रत्येकवेळी वेगवेगळ्या अडचणी या व्यवसायासमोर येत असल्याने हा व्यवसाय दिवसेंदिवस थंडावत चालला आहे. व्यवसायाला उर्जितावस्था मिळण्यासाठी विविध संघटनाव्दारे प्रयत्न सुरु असले तरी अद्यापही यंत्रमाग व्यवसायिकांना विविध सुविधा मिळण्यासह मालावर अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे शासनाने यंत्रमाग व्यवसाय व त्याच्याशी निगडीत असलेल्या सर्व व्यावसायिकांना योग्य ती मदत करून परिस्थिती सुधारण्याची मागणी होत आहे. 

येथे तयार होणारा माल कर्नाटक शासनाने खरेदी केल्यास वाहतूक खर्च कमी होऊन व्यावसायिकांना दिलासा मिळणार आहे. शिवाय सतत तुटवडा भासणाऱ्या सुताचाही मुलबक पुरवठा होणे गरजेचे आहे. शासनाने उद्योग, व्यवसाय वाढीसाठी लागणारा सर्व कच्चा माल वेळेत पुरविल्यास कारखानदारांसह मजूरवर्ग वाचणार आहे. 

दिवसातून सुताचे दर तीन वेळा ठरविले जातात. त्यामुळे त्याचा फटका यंत्रमाग व्यावसायिकांना बसतो. त्यासाठी सूत दर निश्‍चित करणे गरजेचे आहे. या परिसरात तयार होणाऱ्या कापडाला 4.5 पैसे मजूर मिळत आहे. मजूरी कमी व खर्च जास्त असे चित्र सध्या या व्यवसायात दिसत आहे. त्यामुळे काही यंत्रमागधारकांनी आपले यंत्रमाग विकणे पसंत केले आहे. तर काहींनी व्यवसाय बंद ठेवला आहे. कर्नाटक शासनाने यंत्रमाग व्यवसायाला मदत केल्यास हा व्यवसाय टिकून राहणार आहे. अन्यथा या भागातील यंत्रमाग मजूर महाराष्ट्राकडे वळण्याची चिन्हे आहेत. 

वीस दिवसापासून सूत मिळत नसल्याने यंत्रमाग व्यवसाय मंदीत आहे. तोटा सहन करण्यापेक्षा यंत्रमाग बंद ठेवणे अनेकांनी पसंत केले आहे. मुळातच हा व्यवसाय अडचणीत असताना वेगवेगळय अटी, नियम व सतत बदलणारे सुताचे दर हे व्यवसायिकांना मंदीकडे घेऊन जात आहेत.
- चेतन स्वामी,
यंत्रमाग कारखानदार
 

Web Title: Due to scarcity of the yarn, the power loom closes in Nipani area