चुकीच्या जीवनशैलीमुळे तरुणांची तिशीतच हाडे होतायत ठिसूळ!

शिवप्रसाद देसाई
गुरुवार, 1 ऑगस्ट 2019

सध्या चाळीशीतील 80 टक्के महिलावर्गांमध्ये, तर या वयोगटातील 50 टक्के पुरुषांमध्ये 'ड' जीवनसत्त्वाची कमतरता दिसून येते. या कमतरतेने हाडांची समस्या प्रामुख्याने उद्भवते. वृद्धांमध्ये हाडे ठिसूळ होत शस्त्रक्रियेची वेळ येते, अशी माहिती जे. जे. रुग्णालयाच्या ऑर्थोपॅडिक विभागाचे प्रमुख डॉ. एकनाथ पवार यांनी दिली.

मुंबई : सूर्यप्रकाश न अनुभवणाऱ्या शहरातील माणसांना 'ड' जीवनसत्त्व मिळेनासे झाले आहे. ही समस्या चाळीशीतील माणसांमध्ये प्रामुख्याने दिसून येत असली, तरीही विशीतल्या तरुणांमधील वाढती चुकीची जीवनशैली त्यांना येत्या दहा वर्षांतच ठिसूळ हाडे आणि विविध आजारांनी ग्रासून टाकेल, अशी भीती डॉक्‍टर व्यक्त करीत आहेत. त्यामुळे तिशीत येतायेताच त्यांना वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागण्याची भीती आहे. 

सध्या चाळीशीतील 80 टक्के महिलावर्गांमध्ये, तर या वयोगटातील 50 टक्के पुरुषांमध्ये 'ड' जीवनसत्त्वाची कमतरता दिसून येते. या कमतरतेने हाडांची समस्या प्रामुख्याने उद्भवते. वृद्धांमध्ये हाडे ठिसूळ होत शस्त्रक्रियेची वेळ येते, अशी माहिती जे. जे. रुग्णालयाच्या ऑर्थोपॅडिक विभागाचे प्रमुख डॉ. एकनाथ पवार यांनी दिली. सध्या विशीत असलेल्या पिढीला, तर येत्या दहा वर्षांतच ठिसूळ हाडांची समस्या भेडसावण्याची भीती डॉ. पवार यांनी व्यक्त केली. 

शीव येथील टिळक रुग्णालयाचे ऑर्थोपॅडिक विभागाचे प्रमुख डॉ. अरविंद गोरेगावकर यांनीही याला दुजोरा दिला. तरुणपिढी मोबाईल आणि इंटरनेटच्या विळख्यात आहे. सकाळचे कोवळे ऊन तर सोडाच, परंतु उन्हात बाहेर फिरणे, मैदानी खेळ खेळणे, व्यायाम करणे हेच नव्या पिढीने बंद केले आहे. त्यामुळे त्यांना हाडांच्या विविध समस्या जाणवू लागल्या असल्याचे आमचे निरीक्षण असल्याचे ते म्हणाले. 

हालचालीवर मर्यादा, हाडे दुखणे यामुळे एका तरुणीला सहा महिने व्हिलचेअरवरच बसून राहावे लागले होते. तिची तपासणी केली असता तिच्या शरीरात 'ड' जीवनसत्त्वाचे प्रमाण केवळ तीन एवढेच दिसून आले. साधारणतः माणसाच्या शरीरात तीस ते शंभरपर्यंत 'ड' जीवनसत्त्व अपेक्षित असते. मात्र, हल्लीच्या तरुणांमध्ये ही मात्रा फारच कमी दिसून येत असल्याची माहिती डॉ. गोरेगावकर यांनी दिली. सूर्यप्रकाशाव्यतिरिक्त मांसाहार हा 'ड' जीवनसत्त्वाचा प्रमुख स्त्रोत असला, तरीही मांसाहारी लोकांमध्येही त्याची कमतरता दिसून येत असल्याचे त्यांनी सांगितले. 

व्यायामाचा अभाव 
थकवा, अशक्तपणा, कंटाळा येणे ही 'ड' जीवनसत्त्व कमी असल्याची लक्षणे आहेत. नियमित व्यायाम केल्याने हाडे मजबूत होत असल्याचेही शरीरशास्त्रज्ञ सांगतात, मात्र हल्लीची पिढी व्यायामाच्या बाबतीत आळशी झाल्यानेही त्याचा वाईट परिणाम हाडांवर होतो, असेही जाणकार दाखवून देत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Due to the wrong lifestyle the bones of young people are brittle