स्वच्छता करा, पुण्य कमवा- मोदींचा संदेश

वृत्तसंस्था
बुधवार, 3 मे 2017

रामदेव बाबांनी योग सर्वत्र पोचवला
रामदेव बाबांनी 'योग' सर्वांपर्यंत पोचवला, योगासाठी कुठेही हिमालयात जाण्याची आवश्यकता नसून, कोणत्याही ठिकाणी आपण योग करू शकतो याची जाणीव त्यांनी लोकांनी करून दिली, असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले.

हरिद्वार- "प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेवर (प्रिव्हेंटिव हेल्थकेअर) भर देणे गरजेचे आहे. त्यासाठी स्वच्छता महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. देश स्वच्छ ठेवण्यासाठी खूप काही वेगळं करावं लागणार नाही. भारतातील 125 कोटी लोकांनी स्वच्छतेचा निर्धार केला तर देशात अस्वच्छता राहणार नाही. एखाद्या गरीब व्यक्तीला मदत करून जे पुण्य कमावता येऊ शकते तेच पुण्य स्वच्छतेने कमावता येऊ शकते," असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पतंजली संशोधन संस्थेचे उद्धाटन करण्यात आले. पतंजली संशोधन संस्था आयुर्वेद क्षेत्रात आंतरराष्ट्रीय मानकांनुसार संशोधन करणारी पहिली संस्था असणार आहे. 
'आज जगाच्या प्रत्येक देशात योग दिवस साजरा केला जातो, जगात वेगवेगळ्या देशांत फिरत असताना लोक उत्सुकतेने योगाबद्दल प्रश्न विचारतात,' असे त्यांनी यावेळी सांगितले. 

उद्घाटनप्रसंगी स्वामी रामदेव यांच्या कार्याचे कौतुक करताना मोदी म्हणाले, रामदेव बाबांनी सामान्य लोकांनी समजेल अशा भाषेत आयुर्वेदाची माहिती त्यांच्यापर्यंत पोहचवली. आज त्यांच्यामुळे आयुर्वेद जगभरातील लोकांपर्यंत पोहचत आहे. आज जगभरातील लोक योगा शी जोडलेले आहेत व आयुर्वेदाशी जोडण्याचीही त्यांची इच्छा असलेला मोठा वर्ग जगभरात आहे.

"आयुर्वेदिक औषधी जगभर पोचवण्याची गरज आहे. पतंजली संशोधन संस्था यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावेल," अशी अपेक्षा मोदींनी याप्रसंगी व्यक्त केली.

Web Title: earn virtue with cleanliness says narendra modi