डॉ. जेटली हकीकत सबको मालूम है: राहुल गांधी

वृत्तसंस्था
बुधवार, 1 नोव्हेंबर 2017

टाटा नॅनोच्या प्रकल्पासाठी मोदींनी 33 हजार कोटी रुपयांचे बँकेचे कर्ज घेतले आहे. या पैशात गुजरातमधील प्रत्येक शेतकऱ्याचे कर्ज माफ झाले असते. नॅनो प्रकल्पाला पैसा, पाणी सर्व पुरविले पण आज ही गाडी कोठेच दिसत नाही. हेच मोदींचे गुजरात मॉडेल आहे का?

भरूच : 'इज ऑफ डुईंग बिझनेस'ची सत्यता सगळ्यांना माहिती आहे. मात्र, तरीही डॉ. जेटली स्वतःला खूश ठेवण्यासाठी हे चांगले आहे, अशी खोचक टीका काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे. 

आजपासून (बुधवार) तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधी यांनी ट्विट करून 'इज ऑफ डुईंग बिझनेस'वरून सरकारला लक्ष्य केले. जेटली यांनी जमिनीवर उतरून सत्यता बघावी, एसीत बसून लोकांचे हाल दिसणार नाहीत, अशी जोरदार टीका राहुल गांधी यांनी भरुच येथील सभेत केली. 'इज ऑफ डुईंग बिझनेस' या उद्योगानुकूल वातावरणनिर्मितीमध्ये जागतिक बॅंकेने भारताच्या मानांकनात मोठी सुधारणा केली आहे. यामुळे भारताचे मानांकन 130 वरून 100 झाले आहे. अर्थात, जागतिक बॅंकेने यंदा यात "जीएसटी'चा विचार केला नसला, तरी "जीएसटी'मुळे पुढील वर्षी मानांकन आणखी उंचावेल, असा दावा अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केला होता. यावरून राहुल यांनी जेटलींना लक्ष्य केले आहे.

राहुल गांधी म्हणाले, ''आज गुजरातमध्ये पाण्याची समस्या भीषण आहे. शेतकरी पाण्यासाठी रडत आहे. मोजक्या उद्योगपतींना सर्व सोई पुरविण्यात येत आहेत. नोकऱ्यांच्या बाबतीतही अशीच परिस्थिती आहे. मोदी जेव्हा आपल्या मोबाईलचे सेल्फी घेण्यासाठी बटन दाबतात तेव्हा चीनमध्ये युवकाला नोकरी मिळते. मात्र, आपल्याकडे मोजक्या नोकऱ्या उपलब्ध आहेत. चीनसोबत आपण स्पर्धा करूनही आपल्याकडे मेड इन चायनाच चालते. चीनमध्ये दररोज 50 हजार युवकांना नोकऱ्या मिळत आहेत. तर, आपल्याकडे फक्त 450 नोकऱ्या उपलब्ध आहे. हेच भाजपचं विकासाचे मॉडेल आहे. भाजप गेल्या तीन वर्षांपासून सत्तेत आहे. त्यांनी एकतरी स्वीस बँकेत खाते असलेल्या व्यक्तीचे नाव जाहीर करून दाखवावे आणि मोदींनी कोणाला कारागृहात टाकले ते सांगावे. 'इज ऑफ डुईंग बिझनेस'बाबत जेटलींनी येथील व्यापाऱ्यांना येऊन विचारावे, काय परिस्थिती आहे. जीएसटी, नोटाबंदीमुळे उद्योग, व्यवसाय उद्ध्वस्त झाले आहेत.''

टाटा नॅनोच्या प्रकल्पासाठी मोदींनी 33 हजार कोटी रुपयांचे बँकेचे कर्ज घेतले आहे. या पैशात गुजरातमधील प्रत्येक शेतकऱ्याचे कर्ज माफ झाले असते. नॅनो प्रकल्पाला पैसा, पाणी सर्व पुरविले पण आज ही गाडी कोठेच दिसत नाही. हेच मोदींचे गुजरात मॉडेल आहे का, असा प्रश्न राहुल गांधी यांनी उपस्थित केला.

Web Title: Ease Of Doing Business? Ask Small Traders, Says Rahul Gandhi In Gujarat