दोन वर्षांसाठी काश्‍मीरमधील निवडणुका रद्द करा: सुब्रमण्यम स्वामी

वृत्तसंस्था
मंगळवार, 11 एप्रिल 2017

तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनामुळे चेन्नईतील आर के नगर मतदारसंघातील त्यांच्या जागेवर होणारी निवडणूक रद्द झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी वाढत्या हिंसाचारामुळे काश्‍मिरमध्ये दोन वर्षांसाठी निवडणूका रद्द करण्याची सूचना निवडणूक आयोगाला केली आहे.

नवी दिल्ली - तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनामुळे चेन्नईतील आर के नगर मतदारसंघातील त्यांच्या जागेवर होणारी निवडणूक रद्द झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी वाढत्या हिंसाचारामुळे काश्‍मिरमध्ये दोन वर्षांसाठी निवडणूका रद्द करण्याची सूचना निवडणूक आयोगाला केली आहे.

वृत्तसंस्थेशी बोलताना स्वामी म्हणाले, "काश्‍मीरमध्ये जो काही गोंधळ सुरू आहे त्यामुळे निवडणूक आयोगाने पुढील दोन वर्षांसाठी तेथील निवडणूका रद्द कराव्यात. काश्‍मीरमध्ये पुन्हा शांतता प्रस्थापित होण्यासाठी सरकारने मोठ्या प्रमाणात शस्त्रे, पैसे आणि दारुगोळ्यासह दहा हजार शस्त्रसज्ज सैनिकांना काश्‍मीरमध्ये पाठवायला हवे. त्यामुळे काश्‍मीरमध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखता येऊ शकेल.'

श्रीनगरमधील लोकसभेच्या एका जागेसाठी नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीला अत्यल्प प्रतिसाद मिळाला. तेथील सुरक्षा पथकांसोबत तरुणांची चकमक झाली. त्यामुळे केवळ 6.5 टक्के मतदानाची नोंद झाली. अनेक मतदान केंद्रांवर तरुणांनी हल्ला केला आणि तेथील ईव्हीएम मशीन्स उध्वस्त केल्या.

तरुणांच्या जमावाने मतदान केंद्रावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी सुरक्षा पथकांनी केलेल्या गोळीबारात दोन जण ठार झाले, अशी माहिती स्थानिकांनी दिली आहे.

Web Title: EC should cancel elections in Kashmir for two years : Swamy