दोनशे राजकीय पक्षांची मान्यता रद्द होणार?

वृत्तसंस्था
बुधवार, 21 डिसेंबर 2016

नवी दिल्ली - केवळ कागदोपत्री राजकीय पक्ष म्हणून कार्यरत असलेल्या 200 राजकीय पक्षांची मान्यता रद्द करण्याबाबत केंद्रीय प्रत्यक्ष कर (सीबीडीटी) मंडळाला केंद्रीय निवडणूक आयोग माहिती देणार आहे. सीबीडीटीला या 200 पक्षांची नावेही कळविण्यात येणार आहे.

राजकीय पक्ष म्हणून नोंदणी असतानाही 2005 नंतर एकही निवडणूक न लढविणारे राजकीय पक्ष हे केवळ कर चुकविण्यासाठी पक्ष म्हणून नोंदणी करत असल्याची शंका निवडणूक आयोगाला आहे. त्यामुळेच अशा केवळ कागदोपत्री असलेल्या 200 पक्षांची नावे राजकीय पक्षांच्या यादीतून वगळण्यात येणर आहेत. या संदर्भात सीबीडीटीला लवकरच कळविण्यात येणार आहे. "ही केवळ एक सुरुवात आहे. जे पक्ष गांभीर्याने काम करत नाहीत त्यांना संपवायचे आहे. असे अनेक पक्ष आहेत की जे प्राप्तिकर विवरणपत्र भरत नाहीत किंवा भरत असतील तर त्याची प्रत आयोगाकडे पाठवित नाहीत', अशी माहिती सूत्रांच्या हवाल्याने एका इंग्रजी वृत्तपत्राने दिली आहे. मात्र, अद्याप या संदर्भात काहीही कारवाई करण्यात आलेली नाही.

राजकीय पक्षांसाठी असलेल्या नियमानुसार प्रत्येक राजकीय पक्षाने दरवर्षी आपले प्राप्तिकर विवरणपत्र भरणे आवश्‍यक आहे. विवरणपत्रात 20 हजार पेक्षा अधिक रकमेचे दान देणाऱ्या दात्यांची माहिती देणेही बंधनकारक आहे. सध्या बहुतेक राजकीय पक्ष आपल्याकडे आलेल्या 20 हजार रुपयांपेक्षा कमी रकमेच्या देणग्या या अज्ञात दात्यांकडून आल्याचा दावा करतात.

Web Title: EC to write to CBDT about decision to delist 200 political parties