सरकार बहुमतात; कठोर आर्थिक निर्णय घ्या ः चिदंबरम 

वृत्तसंस्था
गुरुवार, 11 जुलै 2019

"आकड्यांची लपवाछपवी करणारा आणि अत्यंत अस्पष्ट अर्थसंकल्प मांडण्यापेक्षा तुम्हाला मिळालेल्या साडेतीनशे जागांच्या सुस्पष्ट जनादेशाचा सदुपयोग करून ठोस व धाडसी आर्थिक उपाययोजना करणारा अर्थसंकल्प सादर करणे या सरकारकडून अपेक्षित होते,' अशा शब्दांत माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी राज्यसभेत अर्थसंकल्पावर हल्ला चढवला. 

नवी दिल्ली ः "आकड्यांची लपवाछपवी करणारा आणि अत्यंत अस्पष्ट अर्थसंकल्प मांडण्यापेक्षा तुम्हाला मिळालेल्या साडेतीनशे जागांच्या सुस्पष्ट जनादेशाचा सदुपयोग करून ठोस व धाडसी आर्थिक उपाययोजना करणारा अर्थसंकल्प सादर करणे या सरकारकडून अपेक्षित होते,' अशा शब्दांत माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी राज्यसभेत अर्थसंकल्पावर हल्ला चढवला. 

अर्थसंकल्पावरील चर्चेत बोलताना चिदंबरम यांनी देशाच्या पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री असलेल्या निर्मला सीतारामन यांचे अभिनंदन करताना सत्तारूढ नेतृत्वाच्या अर्थधोरणावर हल्ले केले. पाच लाख कोटी डॉलरचे व्यवस्थेचे उद्दिष्ट गाठणे ही सध्याच्या स्थितीत भारतीय अर्थव्यवस्थेसाठी स्वाभाविक प्रक्रिया असेल, जर अर्थधोरणे जागरूकपणे राबवली तर, असे सांगून ते म्हणाले, की मात्र हे स्वप्न दाखवण्यासाठी पंतप्रधान किंवा अर्थमंत्र्यांची काय गरज आहे? अर्थसंकल्पात अर्थव्यवस्था समान करण्यासाठी तुम्ही काय करणार, गुंतवणूक आणि उत्पन्न वाढवण्यासाठी व मूलभूत सुधारणा करण्यासारख्या "स्ट्रक्‍चरल रिफॉर्म्स'वर तुमचे किती लक्ष आहे याचे उत्तर शून्य आहे. 

सकल राष्ट्रीय उत्पन्नाचे (जीडीपी) आकडे अर्थसंकल्पात वेगळे आणि आर्थिक पाहणी अहवालात वेगळे हा प्रकार कसा काय होऊ शकतो, असा प्रश्‍न करून ते म्हणाले, की व्यवस्थेचा विकासदर कायम राखणे आणि वाढवणे यासाठी ठोस आराखडाच सरकारकडे नाही. देशांतर्गत गुंतवणूक आणि त्यासाठीची एतद्देशीयांची बचत करण्याची क्षमता वाढवणे हा अर्थव्यवस्थेच्या ठोस उपाय आहे. तो न करता स्वप्नांचा आणि आशावादाचा मारा करून काहीही साध्य होणार नाही. 

शौचालयांचे वास्तव! 
शौचालय बांधण्याच्या सरकारच्या दाव्याबाबत चिदंबरम म्हणाले, की ज्या पद्धतीने ही शौचालये बांधली जात आहेत ती पाहता हाताने मैला काढण्याच्या अनिष्ट प्रथेचे पुनरुज्जीवन करण्याचे श्रेय तुम्हाला मिळणार असे दिसते. केवळ या वर्षी सेप्टिक टॅंकमध्ये बुडून 88 जणांना प्राण गमवावा लागला आहे. तुम्ही बांधलेल्यांपैकी 43 टक्के शौचालयांमध्ये पाणीच नसल्याने लोक ती वापरत नाहीत. यासाठी त्यांनी नंदुरबार जिल्ह्यातले उदाहरण दिले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Economy is weak, needs bold, structural reforms says P Chidambaram