हाफिज सईदचा गुरुग्राममधील बंगला जप्त

वृत्तसंस्था
मंगळवार, 12 मार्च 2019

नवी दिल्ली - 26/11 मुंबई हल्ल्याचा मुख्य सूत्रधार आणि लष्करे तय्यबाचा म्होरक्या हाफिज सईद याला 'ईडी' दणका दिला आहे. हाफिज सईदचा गुरुग्राममधील बंगला जप्त करण्यात आला असून, या बंगल्याची किंमत कोट्यवधी रुपये असल्याचे समजते.

नवी दिल्ली - 26/11 मुंबई हल्ल्याचा मुख्य सूत्रधार आणि लष्करे तय्यबाचा म्होरक्या हाफिज सईद याला 'ईडी' दणका दिला आहे. हाफिज सईदचा गुरुग्राममधील बंगला जप्त करण्यात आला असून, या बंगल्याची किंमत कोट्यवधी रुपये असल्याचे समजते.

हाफिज सईदने काश्मीरमधील उद्योजक जहूर अहमद शाहर वटाली याच्या मदतीने गुरुग्राममध्ये बंगला विकत घेतला होता. या बंगल्यासाठीचे पैसे सईदने फलाह-ए-इन्सानियत फाऊंडेशन (एफआयएफ) या संस्थेच्या माध्यमातून उभे केल्याचा संशय ईडीला आहे. जहूरला गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये दहशतवादाला आर्थिक रसद पुरवल्याप्रकरणी अटक झाली होती. त्याच्या चौकशीतून हाफिज सईदच्या मालमत्तेचा उलगडा झाला असल्याची माहिती ''द प्रिंट'' या न्यूज वेबसाईटला सूत्रांनी दिली आहे. 

यामध्ये आणखी काही गोष्टींचा खूलासा करण्यात आला आहे. बंगल्यासाठीचे पैसे यूएईतून हवालामार्गे भारतात आल्याचे तपासातून निष्पन्न झाले असल्याचे ''द प्रिंट'ने म्हटले आहे. हाफिज सईदने बनावट नावांचा वापर करुन भारतात तब्बल 24 ठिकाणी मालमत्ता खरेदी केल्याचे ईडीच्या तपासात समोर आले आहे. उर्वरित मालमत्तांवरही लवकरच जप्तीची कारवाई करण्यात येणार असल्याचे ईडीतील सूत्रांनी सांगितले. 

मालमत्तेच्या खरेदीसाठी वापरण्यात आलेल्या बँक खात्यांचा तपशीलही ईडीने गोळा केल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.

हाफिजवर मुंबई हल्ल्यानंतर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने 10 डिसेंबर 2008 मध्ये बंदी घातली होती. हाफिजने 2017 मध्ये या बंदीविरोधात लाहोर येथील लॉ फर्म मिर्झा अँड मिर्झाच्या माध्यमातून अपील दाखल केले होते. तेव्हा तो पाकिस्तानमध्ये नजरकैदेत होता. प्रतिबंधित दहशतवाद्यांच्या यादीतून वगळण्याचे सईदचे अपील संयुक्त राष्ट्राने नुकतेच फेटाळले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ED attaches Gurugram villa owned by Lashkar chief Hafiz Saeed