मायावतींच्या भावाकडून 1 कोटी 43 लाख जप्त

वृत्तसंस्था
मंगळवार, 27 डिसेंबर 2016

उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर बसपच्या खात्यांवर टाकलेले छापे महत्त्वपूर्ण मानले जात असून त्यांचा परिनाम निवडणुकांवर पहायला मिळणार आहे.

नवी दिल्ली - सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) दिल्लीतील करोलबाग येथील युनियन बॅंकेवर छापा टाकत आनंदकुमार यांच्या खात्यातील 1 कोटी 43 लाख रुपये जप्त केले. आनंदकुमार हे बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांचे भाऊ आहेत. याचसोबत बसपच्या खात्यातील 104 कोटी रुपयेही जप्त केले आहेत. यामुळे मायावती अडचणीत आल्या आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आनंदकुमार यांच्या खात्यातील 1 कोटी चाळीस लाख रुपयांच्या जुन्या नोटा नोटाबंदीच्या निर्णयानंतर जमा करण्यात आल्या होत्या. ईडीचे पथक करोलबाग येथील युनियन बॅंकेमध्ये साधारण चौकशीसाठी गेले होते. तेव्हा तेथे नोटाबंदीच्या निर्णयानंतर मोठ्या प्रमाणात रोकड भरणा झाल्याची माहिती समोर आली. बसपच्या खात्यामध्ये 102 कोटी रुपयांच्या एक हजार रुपयांच्या जुन्या नोटा जमा करण्यात आल्या होत्या. बाकी रक्कम पाचशेच्या नोटांमध्ये जमा करण्यात आली होती. नोटाबंदीच्या निर्णयानंतर दिवसाच्या फरकाने या खात्यामध्ये 15 ते 17 कोटी रुपये जमा करण्यात आल्याने ईडीचे अधिकारीही बुचकळ्यात पडले.

तपास पथकाला याच बॅंकेमध्ये मायावती यांचे भाऊ आनंदकुमार यांच्या खात्याविषयीही माहिती मिळाली. या खात्यामध्ये नोटाबंदीच्या निर्णयानंतर 1 कोटी 43 लाख रुपये जमा करण्यात आले होते. यामध्ये 18 लाख 98 हजार रुपये जुन्या नोटांच्या स्वरूपात जमा करण्यात आले होते.

ईडीने युनियन बॅंकेकडे आनंदकुमार व बसपच्या खात्यांची सविस्तर माहिती मागविली आहे. तसेच याबाबत प्राप्तिकर विभागालाही माहिती कळविण्यात आलेली आहे. प्राप्तिकर विभागाला राजकीय पक्षांच्या निधीची वैधता तपासण्याचे अधिकार आहेत. याचसोबत ईडीने बॅंक खात्यांचे केवायसी कागदपत्रे व सीसीटीव्ही फुटेजचीही मागणी केलेली आहे.
दरम्यान या प्रकरणी मायावतींचे भाऊ आनंदकुमार यांची चौकशी होण्याबाबत अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. आनंद कुमार यांच्या काही व्यवहारांबाबत ईडी व प्राप्तिकर विभाग आधीपासूनच तपास करीत आहे.

उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर बसपच्या खात्यांवर टाकलेले छापे महत्त्वपूर्ण मानले जात असून त्यांचा परिनाम निवडणुकांवर पहायला मिळणार आहे.

मायावती व त्यांचे भाऊ आनंदकुमार यांच्याविरोधात आतापर्यंत चार वेगवेगळ्या याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. या याचिका वेगवेगळ्या व्यक्तींकडून केलेल्या तक्रारींच्या स्वरूपात दाखल करण्यात आल्या आहेत. यामध्ये आर्थिक गैरव्यवहार तसेच करचुकवेगिरीचे आरोप लावण्यात आलेले आहेत. या प्रकरणी सखोल चौकशीनंतर प्राप्तिकर की कलम 148 नुसार या याचिकांच्या दुबार सुनावणीसाठीची यादी तयार करणार आहे.

ज्या याचिकांची नावे दुबार सुनावणीसाठी वर्गीकृत करण्यात आली आहेत, त्यामध्ये 2012 मध्ये दाखल केलेल्या भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या याचिकेचाही समावेश आहे. सोमय्या यांनी मायावतींविरोधात आर्थिक अनियमिततेचे आरोप केले होते. याचसोबत आणखी एका याचिकेमध्ये कलराज मिश्र यांनी मायावती व त्यांचे भाई आनंदकुमार यांच्यावर बनावट कंपन्या बनविण्याचा आरोप केला आहे.

Web Title: ED detects Rs 1.43 crore in Mayawati's brother's account, Rs 104 crore in BSP account