ED : सोनं, कॅश अन् बरंच काही... लालू यादवांकडील छाप्यात 'ईडी'ला काय मिळालं? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

lalu prasad yadav news

ED : सोनं, कॅश अन् बरंच काही... लालू यादवांकडील छाप्यात 'ईडी'ला काय मिळालं?

नवी दिल्लीः राजद प्रमुख लालू प्रसाद आणि त्यांच्या नातेवाईकांच्या विविध ठिकाणांवर ईडीने छापेमारी केली. लालू यांच्यावर जमिनीच्या बदल्यात नोकरी देण्याच्या घोटाळ्याचा आरोप आहे. ईडीने लालू यांचं कुटुंब, नातेवाईक आणि राजद नेत्यांच्या निवासस्थानावर छापे मारले.

बिहारसह अनेक शहरांमध्ये ईडीने रेड टाकली. त्यानंतर ईडीने अनेक मोठे दावे केले आहेत. रागिनी यादवसह लालू यांच्या दोन्ही मुलींच्या घरी ७० लाख रुपये कॅश आणि सोनं मिळालं आहे.

ईडीवर यादव कुटुंबाकडून त्रास दिल्याचा आरोप होत आहे. यावर ईडीने स्पष्टीकरण दिलंय. चौकशी आणि तपासणी करत असतांना सर्व कायदेशीर बाबींचं पालन केलं गेलं. महिला, लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांसोबत सौजन्याने वागल्याचं ईडीने सांगितलं.

ईडीने सांगितलं की, दिल्लीतल्या न्यू फ्रेंड्स कॉलनी येथे डी-१०८८ चार मजली बंगला आहे. तो एबी एक्स्पोर्टस् प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या नावे आहे. या कंपनीची मालकी आणि ताबा तेजस्वी प्रसाद यादव आणि त्यांच्या परिवाराकडे आहे. ही मालमत्ता केवळ चार लाख रुपयांत घेतल्याचं दाखवण्यात आलेलं आहे. ज्याचा आजचा बाजारभाव १५० कोटी रुपये इतका आहे.

ही प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कॅश आणि गैरमार्गाने जमवलेल्या संपत्तीचा वापर केला गेला असल्याचं सांगण्यात येतंय. ईडीने तब्बल २४ ठिकाणी तपासणी केली आहे. यामध्ये १ कोटी रुपयांची बेहिशोबी संपत्ती, १९०० अमेरिकी डॉलरसह परदेशी नाणी, ५४० ग्रॅम सोन्याची बिस्कीटं आणि दीड किलोपेक्षा अधिक सोन्याचे अलंकार जप्त करण्यात आलेले आहेत.

टॅग्स :BiharLalu Prasad Yadav