चंदा कोचर यांना "ईडी'चे समन्स 

वृत्तसंस्था
रविवार, 9 जून 2019

- सोमवारी पुन्हा चौकशी
- मालमत्तेवर लवकरच टाच येणार 

नवी दिल्ली: व्हिडिओकॉन कर्ज गैरव्यवहारप्रकरणी सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) आयसीआयसीआय बॅंकेच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर यांना पुढील आठवड्यात चौकशीसाठी पाचारण केले आहे. "ईडी'ने या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचा निर्णय घेतला असून, त्यानुसार बॅंकेतील इतर अधिकाऱ्यांचीही चौकशी होण्याची शक्‍यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

व्हिडिओकॉन समूहाला कर्ज देताना नियम डावलल्याचा आरोप चंदा कोचर यांच्यावर असून, या प्रकरणी त्यांचे पती दीपक कोचर यांचीही चौकशी "ईडी'कडून सुरू आहे. तत्पूर्वी "ईडी'ने गेल्या गुरुवारी चंदा कोचर यांना चौकशीसाठी बोलविले होते. मात्र, काही कारणास्तव त्यांनी ही चौकशी पुढे ढकलण्याची मागणी केली होती. त्यानंतर "ईडी'ने पुन्हा समन्स बजावत कोचर यांना सोमवारी (ता. 10) चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत. 

दरम्यान, गेल्या महिन्यात "ईडी'ने कोचर दांपत्याची आठ तासांपेक्षा अधिक वेळ चौकशी करून जबाब नोंदवून घेतला होता. "ईडी'कडून लवकरच कोचर दांपत्य व या प्रकरणाशी संबंधित इतरांच्या मालमत्तेची पडताळणी केली जाणार असून, त्यानंतर "पीएमएलए' कायद्याअंतर्गत त्यावर टाच आणली जाणार असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ED Summons Chanda Kochhar Next Week in ICICI Bank-Videocon PMLA Case