सीबीएसई बारावी अर्थशास्त्र, दहावी गणिताचा पेपर पुन्हा होणार

वृत्तसंस्था
बुधवार, 28 मार्च 2018

सीबीएसई बोर्डाचे बारावी अर्थशास्त्र आणि दहावी गणित विषयाचे पेपर फुटल्याचे समजल्यानंतर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावर नाराजी व्यक्त केली होती. पंतप्रधानांनी मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांच्याशी याविषयी चर्चाही केल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात येत आहे.

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (सीबीएसई) घेण्यात येणाऱ्या बारावी अर्थशास्त्र आणि दहावी गणित विषयाचे पेपर फुटल्याचे समोर आल्यानंतर या विषयांच्या परीक्षा पुन्हा घेण्यात येणार आहेत. याबाबतचे परिपत्रक सीबीएसई बोर्डाकडून आज (बुधवार) काढण्यात आले. तसेच या परीक्षेचे पुढील वेळापत्रक मंडळाच्या संकेतस्थळावर लवकरच जाहीर केले जाईल, असेही मंडळाकडून सांगण्यात आले.

CBSE

सीबीएसई बोर्डाचे बारावी अर्थशास्त्र आणि दहावी गणित विषयाचे पेपर फुटल्याचे समजल्यानंतर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावर नाराजी व्यक्त केली होती. पंतप्रधानांनी मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांच्याशी याविषयी चर्चाही केल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात येत आहे. तसेच पंतप्रधानांनी यावर कडक पावले उचलण्याचे आदेश संबंधित प्रशासनाला दिल्याचे सांगण्यात येत आहे. 

बारावी आणि दहावी परीक्षेचा पेपर फुटल्याचे समोर आले होते. त्यानंतर सीबीएसई बोर्डाने यावर कडक पावले उचलली आहेत. त्या पार्श्वभूमीवर बोर्डाकडून पुन्हा परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या परीक्षेचे नवीन वेळापत्रक आणि इतर काही माहिती सीबीएसई बोर्डाच्या संकेतस्थळावर येत्या आठवडाभरात जाहीर केले जाईल, असे सांगण्यात आले आहे. 

दरम्यान, सीबीएसई बोर्डाच्या या निर्णयाविरोधात काही शिक्षक, पालक आणि विद्यार्थी दिल्ली उच्च न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहेत. 

Web Title: Education CBSE orders re exam of Class XII economics and Class X mathematics papers