आधारचा गैरवापर फौजदारी गुन्हा ठरवा- एडवर्ड स्नोडेन

वृत्तसंस्था
रविवार, 19 ऑगस्ट 2018

सार्वजनिक सेवा वगळता इतर कारणांसाठी आधारच्या माहितीची गैरवापर करणाऱ्यांवर सरकारने कायदेशीर कारवाई करावी, असे मत एडवर्ड स्नोडेन यांनी व्यक्त केले. 

जयपूर : सार्वजनिक सेवा वगळता इतर कारणांसाठी आधारच्या माहितीची गैरवापर करणाऱ्यांवर सरकारने कायदेशीर कारवाई करावी, असे मत एडवर्ड स्नोडेन यांनी व्यक्त केले. 

अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा "सीआयए'कडून जनेतवर पाळत ठेवण्यात येत असल्याचे स्नोडेन यांनी उघडकीस आणले होते. स्नोडेन यांनी आज येथे आयोजित कार्यक्रमात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. ते म्हणाले, ""भारत सरकार जनतेच्या भल्यासाठी आधारची अंमलबजावणी करण्याबाबत गंभीर असेल तर प्रथम माहितीची गैरवापर करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई होईल, यासाठी पावले उचलावीत. जनतेचे सर्व तपशील जमा करणाऱ्या हेरगिरी कार्यक्रमाप्रमाणे आधारमुळे समाजाचे वर्गीकरण होण्याची शक्‍यता आहे. आधार योजनेत याविषयी उल्लेख करण्यात आलेला नाही.'' 

हेरगिरी कार्यक्रमाविषयी विचारलेल्या प्रश्‍नावर बोलताना ते म्हणाले, ""कोणतेही सरकार जनतेला तुम्हाला अधिकार नाहीत, असे म्हणत नाही. याऐवजी जनतेचे हित जपण्यासाठी आणि संरक्षण करण्यासाठी नवा कार्यक्रम आणल्याचे सांगतात. जनतेला कधीही सांगावे लागत नाही की आम्हाला खासगीपणा हवा आहे. सरकारच याबद्दल कायम सांगत असते.'' 

तरुण खासगीपणाच्या हक्काबाबत जागरूक नसल्याचा गैरसमज निर्माण झाला आहे. याउलट तरुण याबद्दल अधिक गंभीर आणि जागरूक आहेत. चांगल्या तंत्रज्ञानाची व्यवस्था आणि सक्षम कायदाव्यवस्था असल्यास खासगीपणाच्या हक्काचे संरक्षण होईल. - एडवर्ड स्नोडेन

Web Title: Edward Snowden demands penalty for misuse of Aadhaar data