विमानतळावरील कोंडी आता होणार कमी

वृत्तसंस्था
रविवार, 23 जून 2019

हवाई सेवेची वाढती गरज लक्षात घेऊन आणि उड्डाणांची संख्या पाहता व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.

नवी दिल्ली : हवाई वाहतूक अधिक सुरळीत राहावी आणि विमानतळावरील कोंडी कमी करण्यायासाठी उपयुक्त ठरणारी यंत्रणा आजपासून कार्यान्वित करण्यात आली. विमानतळ नागरी प्राधिकरणाच्या वतीने स्थापन करण्यात आलेल्या सेंट्रल एअर ट्रॅफिक फ्लो मॅनेजमेंट कॉम्प्लेक्‍सचे उद्‌घाटन केंद्रीय नागरी उड्ड्यनमंत्री हरदीप पुरी यांच्या हस्ते झाले. 

सेंट्रल एअर ट्रॅफिक फ्लो मॅनेजमेंट कॉम्प्लेक्‍सच्या माध्यमातून देशभरातील अंतर्गत आणि आंतराष्ट्रीय हवाई वाहतुकीवर नियंत्रण ठेवले जाणार आहे. केंद्राच्या मदतीने विमानतळावर किती कोंडी आहे आणि किती काळात ती कोंडी संपेल, हे समजण्यास हातभार लागणार आहे. या कारणास्तव हवाई वाहतूक वळविणे सोपे जाणार आहे. एका अहवालानुसार भारतातील हवाई क्षेत्र वेगाने विस्तारत आहे.

एका अंदाजानुसार, भारताला येत्या दोन दशकांत सुमारे 1600 विमानांची गरज भासणार आहे. त्यामुळे या क्षेत्राला 224 अब्ज डॉलर मूल्याचे विमान खरेदी करावे लागणार आहे. हवाई सेवेची वाढती गरज लक्षात घेऊन आणि उड्डाणांची संख्या पाहता व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. आगामी काळात सेंट्रल एअर ट्रॅफिक फ्लो मॅनेजमेंट कॉम्प्लेक्‍सची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Effective mechanism to reduce the dump on the airport