'रमजान' दिनीसुद्धा काश्‍मीरात लष्कराविरोधात दगडफेकीचे सत्र

वृत्तसंस्था
सोमवार, 26 जून 2017

दक्षिण काश्‍मीरमधील पुलवामा जिल्ह्यामध्ये आंदोलकांनी भारतीय लष्कराविरुद्ध घोषणा देत जमात उद दवा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्‍या हफीझ सईद, हिझबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा ठार करण्यात आलेला म्होरक्‍या बुऱ्हान वणी यांचे फलक झळकाविले

श्रीनगर - इस्लामधर्मीयांसाठी अत्यंत पवित्र सण मानला जात असलेल्या रमजानच्या दिवशीसुद्धा जम्मु काश्‍मीरमधील परिस्थिती अत्यंत तणावग्रस्त असल्याचे दिसून आले. ईदच्या प्रार्थनेनंतर खोऱ्यामधील विविध भागांत काश्‍मिरी आंदोलक व लष्करामध्ये संघर्ष झाला. अनंतनाग येथे आंदोलकांकडून लष्करावर दगडफेकही करण्यात आली.

श्रीनगर येथील ईद गाह येथे तुफान दगडफेक करणाऱ्या आंदोलकांना पांगविण्यासाठी सुरक्षा दलांकडून अश्रुधुराचा वापर करण्यात आला. सोपोर येथे "आझादी'च्या घोषणा देण्यात आल्या. दक्षिण काश्‍मीरमधील पुलवामा जिल्ह्यामध्ये आंदोलकांनी भारतीय लष्कराविरुद्ध घोषणा देत जमात उद दवा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्‍या हफीझ सईद, हिझबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा ठार करण्यात आलेला म्होरक्‍या बुऱ्हान वणी यांचे फलक झळकाविले. याशिवाय, काश्‍मीरमधील फुटीरतावादी नेते मसरत आलम भट व सय्यद अली शाह गिलानी यांची स्वाक्षरी असलेले फलकही आंदोलकांकडून वापरण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

काश्‍मीरमध्ये मोहम्मद आयुब पंडित या पोलिस अधिकाऱ्याची जमावाकडून निर्घृण पद्धतीने हत्या करण्यात आल्यानंतर परिस्थिती अधिक चिघळली आहे. या पार्श्‍वभूमीवर होणारी ही आंदोलने अत्यंत संवेदनशील मानण्यात येत आहेत.

Web Title: Eid marred by pelting, teargas in Kashmir