गांजा, अमली पदार्थ विक्री प्रकरणी बेळगावात आठ जणांना अटक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 जुलै 2019

  • शहरातील नामांकित अभियांत्रिकी व वैद्यकिय महाविद्यालयाच्या परिसरात गांजा विक्री करणाऱ्या पाच जणांना तसेच अन्य तिघांना पन्नी नावाच्या अमली पदार्थ विक्री प्रकरणात अटक
  • अटकेतील संशयितांमध्ये एकजण महाविद्यालयाचा विद्यार्थी. 
  • दोन्ही प्रकरणात सुमारे 1 लाख 65 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

बेळगाव - शहरातील नामांकित अभियांत्रिकी व वैद्यकिय महाविद्यालयाच्या परिसरात गांजा विक्री करणाऱ्या पाच जणांना तसेच अन्य तिघांना पन्नी नावाच्या अमली पदार्थ विक्री प्रकरणात अटक झाली आहे. विशेष म्हणजे अटकेतील संशयितांमध्ये एकजण महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. दोन्ही प्रकरणात सुमारे 1 लाख 65 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस आयुक्‍त बी. एस. लोकेशकुमार यांनी बुधवारी (ता.17) पोलीस आयुक्‍तालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. 

माळमारुती पोलिसांनी अखीलअहमंद कुतबुद्दीन मुनवळ्ळी (रा. अमननगर), आतिफ नजिरअहंमद चचडी (रा. महातेंशनगर.), सलमान फत्तेखान (रा.विरभद्रनगर) सुरज कल्लाप्पा अगसर (रा. सिध्देश्‍वरनगर काकती), अमीर अब्दुललतिफ बेग (रा. जम्मू काश्‍मीर) अशी अटक झालेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून 15,400 रुपये किमतीचा 1 किलो 540 ग्रॅम गांजा, 3,100 रोकड, पाच हजार रुपये किमतीचे चार मोबाईल संच आणि ऐंशी हजार रुपये किमतीच्या दोन दुचाकी असा एकूण 1 लाख 3 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

अखिलअहंमद हा ट्रक चालक असून तो मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रातील विविध भागातून बेळगावात गांजाची तस्करी करीत होता. तर आतिफ आणि सलमान हे दोघे त्याच्याकडून गांजा खरेदी करीत होते. त्यानंतर महाविद्यालयाचा विद्यार्थी अमिर यांच्या मदतीने त्याची विक्री शहरातील अभियांत्रिकी आणि वैद्यकिय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना केली जात होती. रॅकेटबद्दल माहिती मिळताच माळमारुतीचे पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना अटक केली. यावेळी पोलीस उपायुक्‍त सीमा लाटकर, यशोधा वंटगोडी, एसीपी नारायण बरमणी उपस्थित होते. 

मार्केट पोलिसांकडून तिघांना अटक 
एका महाविद्यालयानजिक असलेल्या कॅन्टोनमेंन्टच्या ट्रक पार्किंगनजिक बेकायदा गांजा आणि पण्णीचा व्यवहार सुरु असताना बुधवारी (ता.17) मार्केटचे पोलीस निरीक्षक विजय मुरगुंडी व त्यांच्या सहकाऱ्यांना छापा टाकून तिघांना अटक केली. अनिकेत अनिल मधुमत्त (वय 21, रा. चव्हाट गल्ली), समीर सादिक देसाई (वय 22, रा. विरभद्रनगर) आणि रामचंद्र परशराम पवार (वय 30, रा. मारुतीनगर) यांना अटक झालेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून 6500 रुपये किमतीचा 650 ग्रॅम गांजा, 25000 रुपये किमतीच्या पण्णीच्या 126 पुड्या व ऐंशी हजार रुपये किमतीच्या दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या. मुख्य संशयित अनिकेत हा हन्नीकेरी (ता.बैलहोंगल) येथून गांजा खरेदी करुन समिर आणि रामचंद्र यांना विक्री करीत होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Eight people arrested in Ganja sale case in Belgaum