आठ संशयित दहशतवाद्यांना अटक- राजनाथ सिंह

वृत्तसंस्था
शुक्रवार, 10 मार्च 2017

सरताज यांच्या निर्णयातून देशाबद्दलची भावना परावर्तित होते. दहशतवादाबरोबर कोणतीही तडजोड होणार नाही.
- दिग्विजय सिंह, कॉंग्रेस नेते

नवी दिल्ली- उत्तर प्रदेशमधील चकमक व मध्य प्रदेशमधील रेल्वे बॉंबस्फोटाच्या तपासादरम्यान, सुरक्षा यंत्रणांनी आठ संशयित दहशतवाद्यांना अटक केल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी आज राज्यसभेत दिली आहे.

लखनौमध्ये झालेल्या चकमकीत ठार झालेला दहशतवादी सैफुल्ला याचा मृतदेह स्वीकारण्यास त्याच्या पित्याने नकार दिला असून, ही बाब प्रशंसनीय व अभिमानास्पद आहे, असे राजनाथ सिंह यांनी स्पष्ट करताच सभागृहातील इतर सदस्यांनीही त्यास दाद दिली. आतापर्यंत आठ संशयितांना अटक करण्यात आली असून, सैफुल्ला रहात असलेल्या ठिकाणाचा शोध घेण्यात यश आले आहे. या प्रकरणांशी संबंधित सर्वांना अटक करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असेही राजनाथ सिंह यांनी सांगितले.

सैफुल्ला रहात असलेल्या ठिकाणाहून 630 जिवंत काडतुसे, 1 लाख 50 हजार रुपये रोख, तीन मोबाईल फोन, चार सीमकार्ड, दोन वायरलेस सेट व विदेशी चलन जप्त करण्यात आल्याची माहितीही राजनाथ सिंह यांनी दिली.

सरताज यांचा देशाला अभिमान
दहशतवादी मुलाचा मृतदेह नाकारणाऱ्या सरताज यांचा देशाला अभिमान असून, कोणताही हिंदू, मुस्लिम किंवा ख्रिश्‍चन दहशतवादाचे समर्थन करत नाही, हीच आपली खरी संस्कृती असल्याचे राजनाथ सिंह म्हणाले.

Web Title: eight terrorist arrested- rajnathsingh