नववर्षात विधानसभांची रणधुमाळी; स्वातंत्र्याच्या पंचहात्तरीमुळे कार्यक्रमांची रेलचेल

टीम ई सकाळ
Friday, 1 January 2021

कोरोनाच्या संसर्गामुळे. लॉकडाउनमुळे अवघा देश ठप्प झाला असताना राजकीय सारीपाटावरचे शह- काटशह मात्र काही थांबले नव्हते. या संसर्गकाळात पार पडलेली बिहार विधानसभेची निवडणूक विशेष लक्षवेधी ठरली. आता नव्या वर्षामध्ये काही मोठ्या राजकीय घडामोडी अपेक्षित आहेत.

नवी दिल्ली -  या दशकाच्या अखेरीचे हे वर्ष गाजले ते कोरोनाच्या संसर्गामुळे. लॉकडाउनमुळे अवघा देश ठप्प झाला असताना राजकीय सारीपाटावरचे शह- काटशह मात्र काही थांबले नव्हते. या संसर्गकाळात पार पडलेली बिहार विधानसभेची निवडणूक विशेष लक्षवेधी ठरली. आता नव्या वर्षामध्ये काही मोठ्या राजकीय घडामोडी अपेक्षित आहेत.

काही राज्यांतील विधानसभा निवडणुकांबरोबरच बड्या पक्षांमध्ये नव्या नेमणुकांची शक्यता आहे. यामुळे देशाचे राजकारण पुन्हा ढवळून निघेल. देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होणार असल्याने वर्षभर कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे केंद्र सरकारचे नियोजन आहे.

येथे रणधुमाळी (एप्रिल- मे २०२१)
पश्‍चिम बंगाल
मागील वर्षभरापासून वंगभूमीत निवडणुकीचे पडघम ऐकू येऊ लागले आहेत, कोणत्याही स्थितीत बंगालचा गड सर करायचाच असा निर्धार उराशी बाळगून मैदानात उतरलेल्या भाजपने थेट ममता बॅनर्जी यांच्याशी टक्कर घेतली आहे. भाजप, ‘तृणमूल’प्रमाणेच काँग्रेस आणि डाव्यांची पक्षांची आघाडीही रणांगणात उतरणार असल्याने या लढतीमधील चुरस आणखी वाढली आहे.

हे वाचा - गुड न्यूज : लवकरच मिळणार कोरोना लस, 2 जानेवारीपासून देशात 'ड्राय रन' ट्रायल

तमिळनाडू
तमिळनाडूची निवडणूक यंदाही प्रस्थापितांमधील संघर्ष ठरू शकते. ऐनवेळी रजनीकांत यांनी माघार घेतल्याने भाजपची कोंडी झाली आहे. याआधी भाजपने अण्णाद्रमुकशी संधान साधण्याचा प्रयत्न केला होता पण त्या पक्षानेच तसा प्रस्ताव फेटाळून लावल्याने भाजपलाच नमती भूमिका घ्यावी लागली. द्रमुक- काँग्रेसची आघाडीही यंदा मोठ्या ताकदीने मैदानात उतरू शकते.

केरळ
डाव्यांचा बालेकिल्ला असणाऱ्या केरळमध्ये याआधी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखालील डावी लोकशाही आघाडी (एलडीएफ) आणि काँग्रेसप्रणीत संयुक्त लोकशाही आघाडी (यूडीएफ) यांच्या लढत पाहायला मिळत असे. यंदा भाजपचेही तगडे आव्हान डाव्या पक्षांसमोर असेल पण ही लढाई एकहाती जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक असेल. संघाचा विस्तार ही भाजपसाठी जमेची बाजू असेल.

हे वाचा - अयोध्या - नियोजित राम मंदिराखाली शरयू नदी; पाया काढण्यात पुन्हा अडथळे

आसाम
भाजपने आसामचा गड कायम ठेवण्यासाठी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्यासमोर विरोधकांचे तगडे आव्हान असेल. शहा आणि त्यांच्या टीमने आतापासून विरोधी आमदारांना गळाला लावायला सुरवात केली आहे. काँग्रेसप्रमाणेच ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटशीही (एआययूडीएफ) भाजपला दोन हात करावे लागतील.

पुद्दुचेरी (केंद्रशासित प्रदेश)
येथे २०१६ मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष बनला होता, या पक्षाला पंधरा जागा मिळाल्या होत्या. द्रमुकने पाठिंबा दिल्यानंतर येथे पक्षाला स्वतःचे सरकार स्थापन करणे शक्य झाले होते. या प्रदेशाचे कार्यक्षेत्र पाहता भविष्यामध्ये येथे फार मोठ्या उलथापालथी होण्याची शक्यता कमीच आहे. द्रमुकचा पाठिंबा असल्याने येथे काँग्रेसचे हात आणखी बळकट होतील. भाजपलाही विस्ताराला संधी आहे.

हे वाचा - नवीन वर्षात राज्य सरकारला सुबुद्धी लाभो; माजी मुख्यमंत्री फडणवीस यांचा टोला

राहुल पुन्हा येणार
प्रमुख विरोधी पक्ष असणाऱ्या काँग्रेसला नव्या वर्षात नवा अध्यक्ष मिळू शकतो. वरिष्ठ नेते राहुल गांधी यांचीच पक्षाच्या अध्यक्षपदी पुन्हा नेमणूक होण्याची शक्यता आहे.

डाव्यांचे विचारमंथन
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या (माकप) पॉलिट ब्यूरोची बैठक जूनमध्ये केरळमध्येच होण्याची शक्यता आहे. या बैठकीमध्ये अनेक धोरणात्मक निर्णय होणे अपेक्षित आहे. केरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे विचारमंथन होत असल्याने त्याला महत्त्व प्राप्त झाले आहे.

Welcome 2021 : न्यूझीलंडमध्ये झालं नव्या वर्षाचं भन्नाट स्वागत; पाहा व्हिडिओ!

भाजपची बैठक
संसदेच्या अर्थसंकल्पी अधिवेशनानंतर भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची एक महत्त्वाची बैठक फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये होऊ शकते. या बैठकीत फार मोठे निर्णय घेतले जाणार नसले तरीसुद्धा काही पक्षांतर्गत फेरबदलांवर शिक्कामोर्तब होऊ शकते.

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव
येत्या १५ ऑगस्ट २०२१ रोजी आपला देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करणार असल्याने वर्षभर कार्यक्रमांची रेलचेल असेल. आतापर्यंत विविध क्षेत्रांत भारताने केलेल्या प्रगतीचा आलेख वेगवेगळ्या स्वरूपात लोकांसमोर मांडण्याचा सरकारचा विचार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: election in 5 states in new year and 75 year of independence