Breaking News : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर; 'या' दिवशी होणार निवडणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Election Commission Of India

Breaking News : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर; 'या' दिवशी होणार निवडणूक

Karnataka Assembly Election 2023 : निवडणुका शांततेत पार पाडण्याचा आमचा प्रयत्न आहे. अलीकडंच आम्ही ईशान्येकडील राज्यांमध्ये यशस्वीपणे निवडणुका पार पाडल्या, असं पत्रकार परिषदेत मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितलं.

राजीव कुमार म्हणाले, 'निष्पक्ष निवडणुका घेणं हे आमचं ध्येय आहे. कर्नाटकात 5.22 कोटी मतदार आहेत. नवीन मतदार जोडण्यावरही आमचा भर आहे. ज्यांचं वय 80 वर्षांपेक्षा जास्त आहे, त्यांना घरबसल्या मतदान करण्याची सुविधा दिली जाणार आहे. राज्यात 80 वर्षे वयोगटातील 12.15 लाखांहून अधिक मतदार आहेत. 276 मतदार 100 वर्षांवरील आहेत. निवडणूक आयोग त्यांच्यासाठी विशेष मदत करेल. एकूण 5.21 कोटी मतदार असून त्यापैकी 2.62 कोटी पुरुष आणि 2.59 कोटी महिला आहेत. तसेच राज्यात एकूण 42,756 ट्रान्सजेंडर आहेत, त्यापैकी 41,000 नोंदणीकृत आहेत.'

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितलं, 'कर्नाटकात 2018-19 पासून 9.17 लाख पहिल्यांदा मतदारांची वाढ झाली आहे. 1 एप्रिलपर्यंतचे 18 वर्षांचे सर्व तरुण मतदार कर्नाटक विधानसभा निवडणुकीत मतदान करू शकतील. आम्ही राज्यातील संवेदनशील मतदान केंद्रं देखील ओळखली आहेत.'

कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात 58 हजारांहून अधिक मतदान केंद्रं असतील. त्यापैकी 28,866 शहरी मतदान केंद्रं असतील. 1,300 हून अधिक मतदान केंद्रं केवळ महिलांसाठी असणार आहेत. 100 बुथवर दिव्यांग कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत, असंही आयोगानं सांगितलं.

कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. राज्यात 10 मे रोजी एकाच टप्प्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत आणि 13 मे रोजी निकाल जाहीर होणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितलं की, कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी 13 एप्रिल रोजी अधिसूचना जारी केली जाईल. 20 एप्रिलपासून नावनोंदणी सुरू होईल. 21 ते 23 एप्रिल या कालावधीत नामनिर्देशनपत्रांचा आढावा घेतला जाणार आहे. 24 एप्रिल ही उमेदवारी अर्ज मागं घेण्याची शेवटची तारीख असणार आहे. दरम्यान, 2018 मध्ये कर्नाटक विधानसभा निवडणुकीचं वेळापत्रक 27 मार्च रोजी जाहीर करण्यात आलं होतं.

गेल्या विधानसभा निवडणुकीबद्दल बोलायचं झालं तर, 2018 मध्ये भाजपनं 104 जागा जिंकल्या होत्या, काँग्रेसनं 80 जागा जिंकल्या आणि जेडीएसनं 37 जागा जिंकल्या होत्या. कोणत्याही पक्षाला पूर्ण बहुमत मिळालं नाही. त्यानंतर काँग्रेस आणि जेडीएसनं मिळून राज्यात सरकार स्थापन केलं. युतीमध्ये जेडीएस नेते कुमारस्वामी यांना राज्याचे मुख्यमंत्री करण्यात आलं. पण, हे सरकार अवघ्या 14 महिन्यांनी कोसळलं.

काँग्रेसच्या अनेक आमदारांनी राजीनामे दिले, त्यामुळं कुमारस्वामी सरकार पडलं. काँग्रेस-जेडीएस युतीचं सरकार पडल्यानंतर भाजपनं येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सरकार स्थापन केलं. मात्र, दोन वर्षांनी येडियुरप्पा यांनी राजीनामा दिला आणि बसवराज बोम्मई यांना राज्याचे मुख्यमंत्री करण्यात आलं.