गांधी जयंतीपासून प्रशांत किशोर यांची पदयात्रा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Election strategist Prashant Kishor Avoiding Announcement of new political party padyatra gandhi jayanti patna
गांधी जयंतीपासून पीकेंची पदयात्रा

गांधी जयंतीपासून प्रशांत किशोर यांची पदयात्रा

पाटणा : निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर (पीके) यांनी आज नव्या राजकीय पक्षाची घोषणा करण्याचे टाळत थेट लोकांमध्ये जाण्याची घोषणा केली. ते यासाठी तीन हजार किलोमीटरची पदयात्रा काढणार असून तिची सुरूवात २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी यांच्या जयंतीपासून होणार आहे. चंपारण्यमधील गांधीजींच्या आश्रमातूनच या यात्रेचा प्रारंभ होईल. येत्या तीन ते चार महिन्यांमध्ये जनसुराजसाठी ‘पीके’ एक वेगळी मोहीम राबविणार असून त्यादरम्यान ते राज्यातील नामांकित लोकांशी संवाद साधतील. राज्यामध्ये ज्यांना सकारात्मक बदल घडवून आणायचे आहेत त्यांना आपण आपल्या चळवळीशी जोडून घेऊन असे ‘पीके’ यांनी म्हटले आहे.

बिहारमध्ये आता बदल आणि नवी विचारधारा यांची आवश्यकता असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पीके म्हणाले, की ‘‘ गरज भासली तर भविष्यामध्ये राजकीय पक्षाच्या स्थापनेचीही घोषणा करण्यात येईल पण तो पक्ष केवळ प्रशांतकिशोर या एका व्यक्तीचा नसेल तर तो जनतेचा असेल. लालू आणि नितीश यांच्या ३० वर्षांच्या राजवटीमध्ये बिहारची सगळ्याच आघाड्यांवर मोठी पीछेहाट झाली आणि हे सर्वांत गरीब राज्य बनले. या वास्तवाला कोणीच नाकारू शकत नाही. आरोग्य, शिक्षण आदी आघाड्यांवर बिहार रसातळाला गेला आहे. बिहारला यामध्ये आघाडी घ्यायची असेल तर नवा विचार आणि नवे प्रयत्न यांची गरज आहे.’’

मार्ग बदलावा लागेल

येत्या दहा ते पंधरा वर्षांमध्ये बिहारमध्ये बदल घडवून आणायचा असेल तर ज्या मार्गावरून सध्या तो चालतो आहे, तो मार्ग त्याच्यासाठी लाभदायी नाही. यामध्ये बदल करणे गरजेचे आहे. या सगळ्यासाठी नवा विचार आणि नवे प्रयत्न हे गरजेचे असतील. कोणतीही व्यक्ती अशाप्रकारची क्षमता केवळ आपल्याकडेच आहे असा दावा करू शकत नाही. राज्याची परिस्थिती सुधारण्यासाठी बिहारमधील प्रत्येक नागरिकाला पुढाकार घेणे गरजेचे आहे, असेही त्यांनी सांगितले.

जनसुराजबाबत चर्चा करणार

मोठ्या संख्येने लोक हे एकाच व्यासपीठावर आले आणि त्यांनीच जर नव्या राजकीय पक्षाच्या उभारणीची गरज व्यक्त केली तर एकत्रितपणे निर्णय घेण्यात येईल. यानंतरच पक्षाची घोषणा केली जाईल. आम्ही पक्ष स्थापन केला तरीसुद्धा तो केवळ माझा पक्ष नसेल तो लोकांचा असेल. ही प्रक्रिया लवकर पूर्ण होणे अपेक्षित आहे. मी काही लोकांना व्यक्तीशः भेटणार असून जनसुराजच्या अंमलबजावणीबाबत त्यांची मते जाणून घेणार आहे. माझा असा अनुभव आहे की जवळपास नव्वद टक्के लोक याला सहमत असतील आणि त्यासाठी एकत्रित प्रयत्न करणेही खूप गरजेचे आहे असेही त्यांनी नमूद केले.

प्रशांतकिशोर हे राजकीय उद्योजक असून आताही प्रसिद्धी मिळविण्यासाठी त्यांनी हा नवा उद्योग सुरू केला आहे. सध्या त्यांच्याकडे कोणतेही काम नसल्याने त्यांनी हा नवा उद्योग सुरू केला आहे. लोकांनी अशा उद्योजकाशी बोलणे योग्य ठरणार नाही.

- हुकुमदेव नारायण यादव, भाजपचे ज्येष्ठ नेते

Web Title: Election Strategist Prashant Kishor Avoiding Announcement Of New Political Party Padyatra Gandhi Jayanti Patna

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top