मायावती म्हणतात, 'एकत्र निवडणुका लोकशाहीविरोधी' 

पीटीआय
गुरुवार, 20 जून 2019

कुठल्याही लोकशाहीसाठी निवडणुका घेणे, ही बाब कधीच अडचणीची असत नाही. तसेच, निवडणुकीच्या खर्चाकडेही ओझे म्हणून पाहणे चुकीचे आहे. 

- मायावती, बसपच्या सर्वेसर्वा 

लखनौ : देशातील सर्व निवडणुका एकाच वेळी घेण्याची संकल्पना लोकशाहीविरोधी आणि घटनाविरोधी आहे, असे टीकास्त्र बहुजन समाज पक्षाच्या (बसप) सर्वेसर्वा मायावती यांनी आज सोडले. "एक देश, एक निवडणूक' या विषयावर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बोलाविलेल्या सर्वपक्षीय बैठकीला मायावती अनुपस्थित होत्या.

देशात सध्या ईव्हीएमबाबत सर्वच जण चिंता व्यक्त करीत असून, याप्रकरणी पंतप्रधान मोदींनी सर्वपक्षीय बैठक बोलावली असती, तर मी त्या बैठकीला उपस्थित राहिले असते, अशा शब्दांत मायावती यांनी सरकारला टोला लगावला. "एक देश, एक निवडणूक' हा देशासमोरील प्रश्‍न नसून, ईव्हीएमऐवजी मतपत्रिकांद्वारे निवडणूक घेणे हा सध्याचा देशासमोरील महत्त्वाचा प्रश्‍न आहे. याबाबत आमचा पक्ष यापुढेही लढत राहील, असे मायावती यांनी म्हटले आहे. 

सर्व निवडणुका एकत्र घेणे, हे भाजपचे नवे नाटक आहे, असा हल्लाबोल मायावती यांनी केला. ईव्हीएमच्या माध्यमातून गैरप्रकार करून लोकशाहीचे अपहरण करण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव असून, त्याकडे दुर्लक्ष व्हावे म्हणून "एक देश, एक निवडणूक'चा मुद्दा उपस्थित केला जात आहे, असे मायावती म्हणाल्या. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Elections together is anti democracy says Mayawati