'मोदीजी, आम्हाला पगार मिळत नाहीये; लक्ष द्या प्लीज!' 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 मार्च 2019

नवी दिल्ली : 'गेल्या तीन महिन्यांपासून आम्हाला पगार मिळालेला नाही. कृपया याकडे लक्ष द्या', अशी विनंती करणारे पत्र 'जेट एअरवेज'च्या वैमानिकांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच लिहिले आहे. केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांच्याकडेही यासंदर्भात पत्रव्यवहार करण्यात आला आहे. 'पगार न मिळाल्यास येत्या एक एप्रिलपासून 'जेट एअरवेज'चे कोणतेही उड्डाण होणार नाही', असा इशाराही देण्यात आला आहे. 

'जेट एअरवेज'चे वैमानिक आणि तंत्रज्ञ यांचे गेल्या तीन महिन्यांपासून पगार झालेले नाहीत. 'ही विमान कंपनी आता कोलमडण्याच्या स्थितीत आहे. यामुळे हजारो कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा येईल. शिवाय, यामुळे भारतीय हवाई क्षेत्राचे गणितच बदलून जाईल आणि हवाई प्रवास सर्वसामान्यांच्या आवाक्‍याबाहेर जाईल', असे जेट एअरवेजच्या वैमानिकांच्या अधिकृत संघटनेने म्हटले आहे. 

'सर्व थकीत पगार 31 मार्चपर्यंत द्या; अन्यथा एक एप्रिलपासून कोणतेही उड्डाण होणार नाही', असा इशारा या संघटनांनी दिला आहे. 'वैमानिक आणि तंत्रज्ञ वगळता इतर सर्वांचे पगार वेळेवर होत आहेत', असा दावाही या संघटनेने केला आहे. 

'जेट एअरवेज'वर सध्या एक अब्ज डॉलरहून अधिक कर्ज आहे. सध्या या कंपनीने त्यांचा दैनंदिन खर्च कमी करण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. रोज 'जेट एअरवेज'ची 150 पेक्षा कमी उड्डाणे होत आहेत.

Web Title: Employees of jet airways requested to Narendra Modi for salary