राज्यात 89 हजार बेरोजगारांना मिळाला रोजगार; केद्र सरकारचा दावा

वृत्तसंस्था
गुरुवार, 11 जुलै 2019

- 13 लाख बेरोजगारांना मिळाला रोजगार.

- महाराष्ट्रातील 89 हजार बेरोजगारांना मिळाल्या नोकऱ्या.

नवी दिल्ली : देशात बेरोजगारीची समस्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र आहे. मात्र, पंतप्रधान रोजगार निर्मिती योजनेच्या माध्यमातून तीन वर्षांत 13 लाख बेरोजगारांना रोजगार मिळाल्याचा दावा केंद्र सरकारकडून केला जात आहे. यामध्ये महाराष्ट्रातील तब्बल 89 हजार जणांना रोजगार मिळाला असल्याचे सांगितले जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार सत्तेत आल्यानंतर रोजगाराच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणजे पंतप्रधान रोजगार निर्मिती योजना. या योजनेच्या माध्यमातून मागील तीन वर्षांत 14 लाख 83 हजार 808 रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याचे सरकारने लक्ष्य ठेवले होते. त्यानुसार रोजगाराची निर्मिती केली जात आहे. यामध्ये 13 लाख बेरोजगारांना रोजगार मिळाल्याचे सांगितले. 

महाराष्ट्रातील 89,567 जणांना मिळाला रोजगार

महाराष्ट्रात 3 वर्षांत 65 हजार 872 रोजगार निर्मितीचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. मात्र, याची प्रक्रिया नियोजनबद्ध पद्धतीने मांडली गेल्याने नियोजित संख्येपेक्षा अधिक म्हणजे 89 हजार 567 रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या गेल्या, अशी माहिती केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Employment to 89 thousand unemployed people in Maharashtra Claims by Central Government