सव्वाशे कोटींच्या भारतात प्रत्येकाला रोजगार देणे अशक्‍य- अमित शहा

पीटीआय
शनिवार, 27 मे 2017

मोदी सरकारच्या तृतीय वर्षपूर्तीनिमित्त पत्रकारांशी बोलताना शहा यांनी प्रत्येकाला रोजगार देणे अशक्‍य असल्याचे सांगत घूमजाव केले. यावेळी शहा यांनी तीन वर्षांत 8 कोटी स्वयंरोजगार निर्माण केल्याचा दावा केला.
 

नवी दिल्ली : सव्वाशे कोटी लोकसंख्येच्या भारतात प्रत्येकाला रोजगार देणे केवळ अशक्‍य आहे, अशी कबुली देतानाच सत्तारूढ भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी, जास्तीत जास्त स्वयंरोजगार निर्माण करण्याचा नरेंद्र मोदी सरकारचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट केले. विरोधी नेत्यांवर कारवाईची तलवार चालविण्याबाबत मोदींची इंदिरा गांधी यांच्याशी तुलना करू नका. आम्ही माध्यमांच्या तोंडाला (अद्याप) कुलूप लावले नाही, असेही शहा यांनी संतापाने नमूद केले.

स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आग्य्रातील नोव्हेंबर 2013 मधील सभेच्या वेळी दर वर्षी एक कोटी रोजगार देण्याचे जाहीर आशवासन दिल्यावर शहांसह अनेकांनी अनेकदा ते तुणतुणे वाजविले. प्रत्यक्षात गेल्या तीन वर्षांत बेरोजगारीचा दर पाच टक्‍क्‍यांपर्यंत वाढल्याचे सरकारी आकडेवारी सांगते. तथापि, मोदी सरकारच्या तृतीय वर्षपूर्तीनिमित्त पत्रकारांशी बोलताना शहा यांनी प्रत्येकाला रोजगार देणे अशक्‍य असल्याचे सांगत घूमजाव केले. यावेळी शहा यांनी तीन वर्षांत 8 कोटी स्वयंरोजगार निर्माण केल्याचा दावा केला. पण त्याची आकडेवारी देण्याचे टाळले. महान भारताच्या निर्मितीसाठी न्यू इंडियाच्या निर्मितीचे आव्हान मोदी सरकारने यशस्वीपणे पेलल्याचेही त्यांनी सांगितले.

काश्‍मीरबाबत मोदी सरकारचे धोरण पूर्णतः फसल्याचे शहा यांनी नाकारले. ते म्हणाले, की 2010 पासून काश्‍मीरमध्ये काही काळानंतर परिस्थिती हाताबाहेर जाते, पण भारत 2-3 महिन्यांत पूर्वपदावर आणतो. यावेळची अस्थिरताही लवकरच संपेल. काश्‍मीरमध्ये दगडफेक करणाऱ्या जमावात अडकलेल्या निवडणूक कर्मचाऱ्यांच्या सुटकेसाठी काश्‍मिरी तरुणाला जीपला बांधून नेणाऱ्या मेजर गोगोईंचे मी समर्थन करतो.
ममता बॅनर्जींपासून लालूप्रसाद यादव यांच्यापर्यंतच्या विरोधी नेत्यांमागे तपासाचा ससेमिरा लावण्याबाबत मोदींची कार्यशैली थेट इंदिरा गांधींच्या कार्यशैलीशी मिळतीजुळती असल्याचा आरोप शहा यांनी फेटाळला. ते म्हणाले, की या नेत्यांची 1000 कोटींची बेनामी संपत्ती गोळा केली, नारदा गैरव्यवहारात यांचे खासदार, नेते अर्धनग्न अवस्थेत पैसे घेताना कॅमेऱ्यात पकडले गेले. त्यांच्यावर कायद्यानेही कारवाई करायची नाही का? यात कायदा आपले काम करेल. इंदिरा गांधींशी तुलना नको, आम्ही माध्यमांच्या तोंडाला कुलूप लावलेले नाही.

सरकारच्या काळातील यशस्वी योजनांची यादी सादर करून शहा म्हणाले, की युरिया, गॅस कोळसा, वीज यांचे उत्पादन, रेल्वेतील गुंतवणूक, ग्रामीण रस्ते व महामार्ग विकास, विदेशी गंगाजळी यात झालेली वाढ विक्रमी आहे. मोदी सरकारने लाल दिव्याची संस्कृती संपविली. नोटाबंदीच्या धाडसी निर्णयाबरोबर बोगस कंपन्यांना वेसण घालून बेनामी संपत्तीचा कायदाही आम्ही केला. निवडणूक सुधारणांना गती देऊन पंचायत ते पार्लमेंट या साऱ्या निवडणुका एकाच दिवशी घेण्याबाबत चर्चा सुरू झाली. कालबाह्य 1110 कायदे संपुष्टात आणले. धोरण लकवा असलेल्या मागील सरकारच्या पार्श्‍वभूमीवर मोदी सरकार ठोस धोरण व वेगवान अंमलबजावणी यामुळे लोकप्रिय झाले आहे. लोकशाहीत विरोधक व टीकाकार प्रसारमाध्यमांचे महत्त्व असले तरी 2014 नंतर प्रत्येक निवडणुकीत भाजपची मतांची टक्केवारी वाढली असून, बहुतांश निवडणुका भाजपने जिंकल्या आहेत.

'तो' फोटो सध्या बिनकामाचा !
शहा यांची पत्रकार परिषद दुपारी सव्वादोनला होती. मात्र मोदी यांच्या आसामातील कार्यक्रमाच्या वेळेशी पर्यायाने त्याच्या वृत्तांकनाशीही क्‍लॅश होत असल्याचे लक्षात येताच ही पत्रकार परिषद एनवेळी दीड तास पुढे ढकलण्यात आली. शहा हे बोलता बोलता चष्मा काढून घाम पुसू लागताच कॅमेरे लखलखू लागले. त्याबरोबर शहा यांनी, ''अरे भाई, आम्ही इतक्‍यात काही निवडणुका हरणार नाही. त्यामुळे माझा असा फोटो तुम्हाला सध्या काही कामाला येणार नाही,'' अशी कोपरखळी मारली.

Web Title: employment to all impossible amit shah narendra modi govt