'महाभारत' संपल्यानंतरच 'महायुती'बाबत बोला: भाजप

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 नोव्हेंबर 2016

उत्तर प्रदेशमध्ये अनेक अडचणी आहेत. कायदा आणि सुव्यवस्था कोसळली आहे. विकास थांबला आहे. त्यानंतरही समाजवादी पक्ष वेळोवेळी युती (गठबंधन) व्हावी किंवा महायुती व्हावी (महागठबंधन) किंवा युती होऊ नये अशा कल्पनांवर चर्चा करत आहे.

- नलिन कोहली

भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशमधील यादव कुटुंबातील काका आणि पुतण्यांनी स्वत:च्या कुटुंबातील महाभारत संपल्यानंतरच "महायुती'बाबत (महागठबंधन) बाबत बोलावे, असा सल्ला भारतीय जनता पक्षाने दिला आहे.

उत्तर प्रदेशमध्ये होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍भभूमीवर यादव कुटुंबियांमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. या पार्श्‍वभूमीवर बोलताना भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते नलिन कोहली म्हणाले की, "उत्तर प्रदेशमध्ये अनेक अडचणी आहेत. कायदा आणि सुव्यवस्था कोसळली आहे. विकास थांबला आहे. त्यानंतरही समाजवादी पक्ष वेळोवेळी युती (गठबंधन) व्हावी किंवा महायुती व्हावी (महागठबंधन) किंवा युती होऊ नये अशा कल्पनांवर चर्चा करत आहे.'

अलिकडेच भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी भाजच्या परिवर्तन रॅली दरम्यान झांशी येथे बोलताना समाजवादी पक्षावर टीका केली होती. उत्तर प्रदेशमधील जनतेला केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजनांपासून दूर ठेवण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. समाजवादी पक्षाच्या रौप्य महोत्सवानिमित्त लखनौ येथे झालेल्या कार्यक्रमात पाच नोव्हेंबर रोजी झालेल्या जाहीर सभेत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि पक्षाचे वरिष्ठ नेते यांनी परस्परांवर सर्वांसमक्ष टीका केली होती. त्यामुळे पक्षातील मतभेद नव्याने समोर आले होते.

Web Title: End your 'Mahabharat' first, then focus on 'Mahagathbandhan': BJP