आता पाकमध्येच 'सर्जिकल स्ट्राइक' 

आता पाकमध्येच 'सर्जिकल स्ट्राइक' 

नवी दिल्ली : दहशतवादाविरोधात सर्व राजकीय पक्षांनी सरकारच्या पाठीशी उभे राहण्याची ग्वाही आज सर्वपक्षीय बैठकीत दिली. मात्र या संवेदनशील विषयावर पंतप्रधानांनीच सर्व राजकीय पक्षांच्या अध्यक्षांना बोलावून सल्लामसलत करायला हवी, अशी मागणी या वेळी करण्यात आली. तसेच भारताचाच हिस्सा असलेल्या पाकिस्तानव्याप्त काश्‍मीरमध्ये नव्हे, तर पाकिस्तानात घुसून सर्जिकल स्ट्राइक करा, असे आवाहनही सरकारला केले. दरम्यान, जम्मू-काश्‍मीरच्या राजौरी जिल्ह्यात प्रत्यक्ष नियंत्रणरेषेवर आज झालेल्या "आयईडी'च्या स्फोटात लष्कराचा एक अधिकारी हुतात्मा झाला, तर एक जवान जखमी झाला. दुसरीकडे, राजस्थानातील पाकिस्तान सीमेवरील पोखरणमध्ये हवाई दलाने जोरदार सराव केला. यात हवाई दलाची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर सहभागी झाली होती. 

पुलवामामध्ये केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) 40 हून अधिक जवानांचा बळी घेणाऱ्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली असून, पाकिस्तानविरुद्ध आक्रमकपणे कारवाईची मागणी देशभरातून होत आहे. या पार्श्‍वभूमीवर गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहांमधील सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांना बोलावून या हल्ल्याबद्दल चर्चा केली. या वेळी संसदीय कार्यमंत्री नरेंद्रसिंह तोमर, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, नॅशनल कॉन्फरन्सचे डॉ. फारुख अब्दुल्ला, शिवसेना नेते संजय राऊत यांच्यासह तृणमूल कॉंग्रेस, बिजू जनता दल, तेलुगू देसम, डावे पक्ष आदी राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. "पीडीपी'चा मात्र कोणीही प्रतिनिधी या बैठकीत नव्हता. 

या वेळी पुलवामातील हल्ल्याचा तसेच सीमेपलीकडून पाठिंबा मिळणाऱ्या दहशतवादाचा एकमुखाने निषेध करणारा ठरावही संमत करण्यात आला. सर्व प्रकारच्या तसेच सीमेपलीकडून पोसल्या जाणाऱ्या दहशतवादाचा एकमुखाने निषेध करताना सर्व पक्ष हुताम्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहेत. सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादाची झळ भारताला गेल्या तीन दशकांपासून सहन करावी लागते आहे. मात्र या आव्हानांचा भारताने सातत्याने ठोसपणे मुकाबला केल्याचे या ठरावात म्हटले आहे. 

डॉ. फारुख अब्दुल्ला तसेच विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी, सुरक्षा दलांवरील आतापर्यंतच्या सर्वांत मोठ्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधानांनीच सर्व राजकीय पक्षांच्या अध्यक्षांशी बोलावून चर्चा करावी, अशी सूचना केली. या सूचनेला अन्य पक्षांनीही पाठिंबा दिला. जम्मूमध्ये काश्‍मिरी तरुणांना संतप्त जमावाकडून लक्ष्य करण्यात आल्याच्या घटनांचाही डॉ. अब्दुल्लांनी उल्लेख केला. यावर गृहमंत्र्यांनी सांप्रदायिक सलोखा कायम राखण्याचे आश्‍वासन देताना अशा कृत्यांमध्ये भाजप कार्यकर्ते असले तरीही त्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा दिला. शिवसेना नेते संजय राऊत यांनी या बैठकीदरम्यान सरकारने इंदिरा गांधींप्रमाणे पाकिस्तानविरुद्ध ठोस कारवाईचे आवाहन केले. सर्जिकल स्ट्राइकबद्दल सातत्याने सांगितले जाते. मात्र ही कारवाई भारताचाच हिस्सा असलेल्या पाकिस्तानव्याप्त काश्‍मीरमध्ये होती. त्याऐवजी पाकिस्तानात घुसून प्रत्युत्तर दिले जावे, अशी मागणी शिवसेनेने केली. सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनीही पाकिस्तानला शांततेची भाषा कळत नसल्याने त्यांना कायमचा धडा शिकवावा, अशी मागणी केली. तसेच पाकिस्तानव्याप्त काश्‍मीर मुक्त करण्याची सूचनाही त्यांनी सरकारला केली. 

हल्ल्याची तपशीलवार माहिती 
प्रारंभी सर्व हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर "सीआरपीएफ'च्या अतिरिक्त महासंचालकांनी हल्ल्याची तपशीलवार माहिती राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना दिली. गृहमंत्री राजनाथ सिंह यांनीही या घटनाक्रमावर भाष्य केले. गृहमंत्र्यांनी जम्मू-काश्‍मीरला दहशतवादाच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी सरकारने सुरक्षा दलांना पूर्ण मोकळीक दिल्याचे सांगितले. तसेच जम्मू-काश्‍मीरमध्ये शांतता नको असणाऱ्या घटकांनी वैफल्यातून हा दहशतवादी हल्ला केला आहे, असे मतही मांडल्याचे संसदीय कार्यमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी या बैठकीनंतरच्या पत्रकार परिषदेत सांगितले. 

पोखरणमध्ये हवाई दलाचा सराव 
पोखरण : राजस्थानातील पाकिस्तान सीमेवरील पोखरणमध्ये हवाई दलाने जोरदार सराव केला. यात हवाई दलाची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर सहभागी झाली होती. पुलवामा हल्ल्यानंतर दोन दिवसांतच हा सराव झाल्याने त्याला महत्त्व दिले जात आहे. सुरक्षा दलांना हल्लेखोरांविरुद्ध कारवाई करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले आहे. 

"वायुशक्ती' या नावाने झालेल्या या सरावात "तेजस' हे हलके लढाऊ विमान, आधुनिक हेलिकॉप्टर, जमिनीवरून आकाशात मारा करणारे "आकाश' तसेच हवेतून हवेत मारा करणारे "अस्त्र' ही क्षेपणास्त्रे सहभागी झाली होती. लढाऊ विमान आणि हेलिकॉप्टर यांनी दिवस-रात्र लक्ष्यभेदाचा सराव केला. सुधारित "मिग-29' हे लढाऊ विमानही सरावात सहभागी झाले होते. त्याशिवाय "एसयू-30', "मिराज-2000', "जॅग्वार', ""मिग-21' या लढाऊ विमानांचाही सरावात सहभाग होता. "आयएल-78 हर्क्‍युलस' आणि "एएन-32' ही विमानेही होती. लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत, विविध देशांचे संरक्षणतज्ज्ञ या सरावास उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com