एर्दोगान पुन्हा तुर्कस्तानचे अध्यक्ष 

पीटीआय
मंगळवार, 26 जून 2018

तुर्कस्तानमध्ये झालेल्या निवडणुकीत घवघवीत यश प्राप्त करत विद्यमान अध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगान यांनी पुन्हा सत्ता हस्तगत केली आहे. पुन्हा पाच वर्षांसाठी सत्ता मिळाल्यामुळे एर्दोगान समर्थकांनी जोरदार जल्लोश सुरू केला असला तरी दुसरीकडे विरोधकांना या निवडणुकीवरच प्रश्नचिन्ह उभे केले आहे. निवडणुकीत अनेक अनियमितता झाल्याचा विरोधकांचा आरोप आहे. 
 

इस्तंबूल - तुर्कस्तानमध्ये झालेल्या निवडणुकीत घवघवीत यश प्राप्त करत विद्यमान अध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगान यांनी पुन्हा सत्ता हस्तगत केली आहे. पुन्हा पाच वर्षांसाठी सत्ता मिळाल्यामुळे एर्दोगान समर्थकांनी जोरदार जल्लोश सुरू केला असला तरी दुसरीकडे विरोधकांना या निवडणुकीवरच प्रश्नचिन्ह उभे केले आहे. निवडणुकीत अनेक अनियमितता झाल्याचा विरोधकांचा आरोप आहे. 

मागील पंधरा वर्षांपासून तुर्कस्तानात सत्तेवर असलेल्या एर्दोगान यांचा अध्यक्षीय निवडणुकीत विजय झाल्याची घोषणा करण्यात आली. सत्ताधारी आघाडीने पहिल्या फेरीतच आवश्‍यक बहुमत प्राप्त केले. इस्तंबूलमध्ये विजयाची घोषणा केल्यानंतर अंकारामध्ये पहाटे साडेतीन वाजता एर्दोगान यांनी विजयी सभा घेतली. 

तुर्कस्तानात प्रथमच संसदीय आणि अध्यक्षीय निवडणुका एकत्र घेण्यात आल्या. या दोन्हीमध्ये एर्दोगान आणि त्यांच्या पक्षाने बाजी मारली आहे.  

निवडणुकीत गैरप्रकाराचे आरोप 
अध्यक्षीय निवडणुकीत विरोधी पक्ष असलेल्या रिपब्लिकन पीपल्स पार्टीचे नेते मुहर्रम इनसे यांनी एर्दोगान यांच्यासमोर तगडे आव्हान निर्माण केले होते. रविवारी एर्दोगान यांना 52.5 टक्के मते मिळाली असून, त्यांचे प्रतिस्पर्धी इनसे यांना 30.7 टक्के मते मिळाल्याचे सांगण्यात आले. विरोधकांनी मात्र निवडणूक प्रक्रियेत अनेक गैरप्रकार झाल्याचा आरोप केला आहे.

Web Title: Erdogan wins re-election as president