लष्कराला मिळणारी नवी शस्त्रे 

पीटीआय
सोमवार, 30 ऑक्टोबर 2017

लष्कराने 40 हजार कोटी रूपयांच्या प्रस्तावास मान्यता दिली आहे, जुन्या शस्त्रांची जागा आधुनिक शस्त्रे घेतील अशी माहिती सूत्रांनी दिली. 
सात लाख रायफली, 44 हजार हलक्‍या मशिनगन आणि 44 हजार 600 कार्बाईन बंदुका खरेदी केल्या जाणार असून, ही एक मोठी खरेदी प्रक्रिया आहे.

नवी दिल्ली (पीटीआय) : चीन आणि पाकिस्तान सीमेवरील तणाव, देशांतर्गत नक्षलवाद आणि अन्य विघटनकारी शक्तींचे वाढलेले प्राबल्य लक्षात घेता भारतीय लष्कराने आधुनिकीकरणासाठी वेगाने पावले उचलायला सुरवात केली आहे. लष्कराचेच अभिन्न अंग असणाऱ्या पायदळालाही आता "मॉडर्न टच' मिळणार आहे. हलक्‍या पण प्रखर भेदक क्षमता असणाऱ्या मशिनगन, बंदुका आणि रायफलीही खरेदी केल्या जाणार आहेत. यासाठी लष्कराने 40 हजार कोटी रूपयांच्या प्रस्तावास मान्यता दिली आहे, जुन्या शस्त्रांची जागा आधुनिक शस्त्रे घेतील अशी माहिती सूत्रांनी दिली. 
सात लाख रायफली, 44 हजार हलक्‍या मशिनगन आणि 44 हजार 600 कार्बाईन बंदुका खरेदी केल्या जाणार असून, ही एक मोठी खरेदी प्रक्रिया आहे. संरक्षण मंत्रालयाने याला हिरवा कंदील दर्शविल्यानंतर लष्करानेही त्यांच्या खरेदीसाठी पुढाकार घेतला आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना दिली. उच्चस्तरीय पातळीवर जरी शस्त्र खरेदी प्रस्तावांना मान्यता देण्यात आली असलीतरीसुद्धा ही शस्त्रे लवकरात लवकर आमच्या हाती यावीत अशी अपेक्षा लष्कराच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. 

पहिल्या चाचणीतील अपयश 
नव्या शस्त्रखरेदीबरोबरच सरकारने संरक्षण, संशोधन आणि विकास संस्थेला (डीआरडीओ) विविध प्रकारची लघुशस्त्रे तयार करण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये "एलएमजी' प्रकारातील बंदुकांच्या निर्मितीवरही भर देण्यात आला आहे. "7.62 एमएम' रायफलींच्या खरेदीवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. मध्यंतरी इशापूरमधील कारखान्यामध्ये भारतीय बनावटीची रायफल तयार करण्यात आली होती; पण पहिल्याच चाचणीमध्ये ती सपशेल अपयशी ठरली होती. 

माहिती मागविली 
भारतीय लष्कराला जुन्या इन्सास रायफली पूर्णपणे रद्द करण्यासाठी सात लाख नव्या रायफलींची गरज आहे. लष्कराने अशा रायफलींची निर्मिती करणे शक्‍य आहे का, हे आजमावण्यासाठी विविध कंपन्यांची माहिती मागविली असता 20 कंपन्यांनी आम्ही अशाप्रकारच्या रायफली तयार करू शकतो असा दावा केला होता. नव्या "एलएमजी' 
बंदुकांच्या निर्मितीसाठी "डीआरडीओ'ला एक विशिष्ट डेडलाइन ठरवून देण्यात आली होती; पण तीही संस्थेला पाळता आली नाही. 
 

Web Title: esakal news ndian army to replace weapons