आयएमएफच्या "एमडी'पदाचे रघुराम राजन प्रबळ दावेदार 

वृत्तसंस्था
सोमवार, 22 जुलै 2019

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आयएमएफ) भावी व्यवस्थापकीय संचालकपदासाठी (एमडी) रिझर्व्ह बॅंकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचे नाव आघाडीवर आहे. "आयएमएफ'च्या विद्यमान एमडी ख्रिस्टीन लगार्ड यांनी नुकतीच या पदावरून पायउतार होण्याची घोषणा केली आहे.

नवी दिल्ली ः आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आयएमएफ) भावी व्यवस्थापकीय संचालकपदासाठी (एमडी) रिझर्व्ह बॅंकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचे नाव आघाडीवर आहे. "आयएमएफ'च्या विद्यमान एमडी ख्रिस्टीन लगार्ड यांनी नुकतीच या पदावरून पायउतार होण्याची घोषणा केली आहे. 

युरोपियन परिषदेने युरोपियन सेंट्रल बॅंकेच्या अध्यक्षपदासाठी लगार्ड यांच्या नावाची शिफारस केली असून, त्या 12 सप्टेंबर रोजी "आयएमएफ'च्या एमडीपदावरून पायउतार होत आहेत, त्यामुळे आर्थिक पटलावर सर्वांत महत्त्वाचे मानले जाणाऱ्या या पदासाठी योग्य उमेदवाराचा शोध सुरू झाला असून, नवीन एमडी हा युरोप व अमेरिका वगळता इतर देशांतून निवडला जावा, अशी मागणी पुढे आली आहे. हा उमेदवार भारतीय असावा, अशी भूमिका ब्रिटनच्या परराष्ट्र मंत्रालयाने घेतल्याचे वृत्त स्थानिक माध्यमांनी दिले असून, रघुराम राजन हे या पदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. 

राजन यांच्यासोबत बॅंक ऑफ इंग्लंडचे मावळते गव्हर्नर मार्क कार्नी, माजी चान्सलर जॉर्ज ऑस्बोर्न, नेदरलॅंडचे अर्थमंत्री जेरॉन डिजस्सेल्बोअम यांची नावेही या पदासाठी चर्चेत आहेत. दरम्यान, बॅंक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदासाठीही राजन यांच्या नावाची चर्चा सुरू होती. मात्र, आपली तशी कोणतीही इच्छा नसल्याचे स्पष्ट करत राजन यांनी या चर्चेला विराम दिला होता. 

हीच योग्य वेळ 
उदयोन्मुख अर्थव्यवस्थेतील व्यक्तीला "आयएमएफ'चे नेतृत्व करण्याची संधी देण्याची ही योग्य वेळ आहे. "आयएमएफ'चे माजी मुख्य अर्थतज्ज्ञ या नात्याने रघुराम राजन हे या पदासाठी अगदी योग्य उमेदवार असल्याचे संडे टाइम्सने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ex-RBI Governor Raghuram Rajan in running for IMF chief’s post?