मोदींनी दिले शास्त्री-लोहियांचे दाखले

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 7 फेब्रुवारी 2020

अर्थव्यवस्थेवर चर्चा होऊ द्या
अर्थव्यवस्थेच्या मंदीवर पंतप्रधान गप्प असल्याचा आरोप खोडून काढताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, संपूर्ण अधिवेशनात अर्थव्यवस्थेच्या वर्तमान स्थितीवर चर्चा होऊ द्या, असे मी अधिवेशनाआधी सर्वपक्षीय बैठकीतच म्हटले होते; पण तुम्हाला निराशेचेच वातावरण तयार करायचे असल्याने ती चर्चाही तुम्हाला नको आहे, असा प्रतिहल्ला चढविला.

नवी दिल्ली - वादग्रस्त सुधारित नागरिकत्व कायद्यावरून (सीएए) खुलाशांमागून खुलासे करण्याचा सिलसिला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज राज्यसभेतही चालू ठेवताना, माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री व समाजवाद्यांचे आदरस्थान असलेले राममनोहर लोहिया यांनीही, पाकमधील अल्पसंख्याक शरणार्थींना भारतात आश्रय द्यायलाच हवा, असे स्पष्ट केल्याच्या उद्‌गारांचे दाखले देताच काँग्रेससह विरोधी बाकांवर काही क्षण शांतता पसरली. मात्र लगेचच पंतप्रधानांनी, खोटे बोलून तुम्ही देशाची दिशाभूल करता? असा तिखट सवाल करताच काँग्रेस सदस्य खवळले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दरम्यान, राष्ट्रपती अभिभाषणाच्या आभारदर्शक ठरावावर मोदींचे उत्तर झाल्यावर राज्यसभेत हा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. मोदींनी खोटे बोलून देशाची पुन्हा दिशाभूल केल्याचा आरोप करत काँग्रेससह विरोधी पक्षांनी सभात्याग केला. दुसरीकडे जागतिक आर्थिक मंदीचाही सर्वाधिक लाभ भारतच घेऊ शकतो, त्यासाठी सूचना द्या, असे आवाहन मोदींनी विरोधकांना केले.

सीएए मुसलमानांच्या विरोधात नाही, याबाबत स्वतः मोदी व अमित शहा वारंवार स्पष्टीकरण देत असूनही याबाबतची भीती व दहशत कमी होण्याचे नाव घेत नसल्याने प्रचंड अस्वस्थ असलेल्या पंतप्रधानांनी आज दिल्ली मतदानापूर्वी विरोधकांवर धारदार हल्ला करण्यासाठी संसदीय व्यासपीठच निवडल्याचे जाणकार मानतात. कारण त्यांच्या सीएएवरील खुलाशानंतरही विरोधकांनी हा कायदा अल्पसंख्याकांच्या विरोधात असल्याचेच एकमुखी मतप्रदर्शन केले.  ‘तुम्ही २४ तास अल्पसंख्याकांच्या नावाने गळे काढता, पण भूतकाळातील घोडचुकांमुळे शेजारी देशांत जे अल्पसंख्याक बनले त्यांचे दुःख तुम्हाला दिसतच नाही का?,’ अशी भावना व्यक्त केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Examples of Shastri Lohia given by Modi