भारतात बलात्कारात वाढ, सावधगिरी बाळगा: अमेरिका

वृत्तसंस्था
गुरुवार, 11 जानेवारी 2018

बलात्कार हा भारतामधील सर्वाधिक वेगाने वाढणारा गुन्हा असल्याची माहिती भारतीय प्रशासनाकडून देण्यात आली आहे. भारतामधील पर्यटन स्थळे आणि इतर ठिकाणी अशा प्रकारचे गुन्हे घडत आहेत. याचबरोबर भारतामध्ये दहशतवादी हल्ले घडविले जाण्याचीही शक्‍यता आहे. यामुळे भारतामध्ये प्रवास करताना अधिक सावधगिरी बाळगावी

वॉशिंग्टन - अमेरिकन नागरिकांनी भारतामध्ये प्रवास करताना "अधिक सावधगिरी बाळगावी,' असा सल्ला येथील प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

अमेरिकन नागरिकांना प्रवासासंदर्भात सल्ला देताना येथील सरकारकडून जगभरातील देशांचे चार गटांत वर्गीकरण करण्यात आले आहे. भारताचा समावेश दुसऱ्या गटातील देशांमध्ये करण्यात आला असून या गटामधील देशांमध्ये प्रवास करताना अमेरिकन नागरिकांनी "अधिक सावधगिरी बाळगावी,' अशी सूचना ट्रम्प प्रशासनाकडून करण्यात आली आहे. पाकिस्तानचा समावेश तिसऱ्या गटामध्ये (येथे भेट देताना पुनर्विचार करावा); तर अफगाणिस्तानचा समावेश चौथ्या गटामध्ये (येथे प्रवास करु नये) करण्यात आला आहे.

"बलात्कार हा भारतामधील सर्वाधिक वेगाने वाढणारा गुन्हा असल्याची माहिती भारतीय प्रशासनाकडून देण्यात आली आहे. भारतामधील पर्यटन स्थळे आणि इतर ठिकाणी अशा प्रकारचे गुन्हे घडत आहेत. याचबरोबर भारतामध्ये दहशतवादी हल्ले घडविले जाण्याचीही शक्‍यता आहे. यामुळे भारतामध्ये प्रवास करताना अधिक सावधगिरी बाळगावी,'' असे अमेरिकेने म्हटले आहे.

याचबरोबर, लडाखचा अपवाद वगळता उर्वरित जम्मु काश्‍मीर राज्यात अमेरिकन नागरिकांनी प्रवास करु नये; तसेच भारत-पाकिस्तान सीमारेषेपासून 10 मैल लांब रहावे, असा सल्लाही अमेरिकन नागरिकांना येथील प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

Web Title: Exercise Increased Caution While Travelling To India: US To Citizens