लोकसभा निवडणुकीकडे फेसबुकची 'नजर'

वृत्तसंस्था
गुरुवार, 10 जानेवारी 2019

''फेसबुकवर प्रत्येकाला पेज किंवा त्यांच्या स्वत:च्या प्रोफाईलवर माहिती पोस्ट करण्याचे स्वातंत्र्य असते. असे स्वातंत्र्य असताना अनेकदा निवडणुकीच्या काळात तथ्यहीन आणि सत्यता न पडताळता माहिती पोस्ट केली जाते. अशा पोस्टवर लगाम आणण्याच्या दृष्टीनेही प्रयत्न करण्यात येतील''.

- केटी हरबथ.

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फेसबुक आणि फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांनी निवडणुकीवर लक्ष केंद्रित करण्याचे ठरवले आहे. फेसबुक आणि मार्क झुकेरबर्ग यांच्यासाठी आगामी निवडणूक 'टॉप प्रायोरिटीज्'मध्ये असल्याचे सांगितले जात आहे. याबाबतचा दावा फेसबुकच्या ग्लोबल पॉलिटिक्स आणि गर्व्हन्मेंट आऊटरिच विभागाच्या संचालक केटी हरबथ यांनी केला आहे.

2019 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीवर देशातील विविध पक्ष लक्ष ठेऊन आहेत. त्यादृष्टीने त्यांच्याकडून तयारीही केली जात आहे. या निवडणुकांचे गांभीर्य लक्षात घेता फेसबुक, भारत सरकार आणि देशातील मतदार यांच्यातील संबंध पाहिले असता ही एक संधी म्हणून पुढे येत आहे. त्यामुळेच व्यवसाय वृद्धीसाठी फेसबुकचे याकडे लक्ष लागले आहे. या निवडणुकांना कमी कालावधी शिल्लक असताना जाहिरातींसह अंतर्गत विविध बाबींकडे लक्ष दिले जाणार आहे. त्यासाठी आवश्यक कामही सुरु केले जाणार आहे. केटी हरबथ यांच्यानुसार, मार्क झुकेरबर्ग आणि फेसबुकचे सीओओ शेरील सँडबर्ग यांच्यासाठीही आगामी निवडणूक 'टॉप प्रायोरिटी' असणार आहेत.

खोट्या पोस्टवर लागणार लगाम

फेसबुकवर प्रत्येकाला पेज किंवा त्यांच्या स्वत:च्या प्रोफाईलवर माहिती पोस्ट करण्याचे स्वातंत्र्य असते. असे स्वातंत्र्य असताना अनेकदा निवडणुकीच्या काळात तथ्यहीन आणि सत्यता न पडताळता माहिती पोस्ट केली जाते. अशा पोस्टवर लगाम आणण्याच्या दृष्टीनेही प्रयत्न करण्यात येतील, असेही केटी हरबथ यांनी सांगितले.  

Web Title: Facebook Attention on Upcoming Lok Sabha elections 2019