
फडणवीस-शिंदे मंत्रिमंडळ विस्तार अखेर मार्गी लागणार? CMचा 'रात्री' पुन्हा दिल्ली दौरा
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस -शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचे गाडे तब्बल महिनाभरानंतर मार्गी लागणार असून, गृह, अर्थ, सार्वजनिक बांधकाम यासह काही महत्त्वपूर्ण विभागांबाबत भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वानेच तोडगा काढल्याचे खात्रीलायकरीत्या समजते. मुख्यतः महत्त्वाची मंत्रालये भाजपकडेच राहण्याची दाट शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोणालाही खबर लागू न देता नुकतेच पुन्हा एका रात्री दिल्लीत येऊन गृहमंत्री अमित शहा यांच्याबरोबर खलबते करून गेल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात आहे. शिंदे यांचा दौरा कागदावर कोठेही येऊ नये याची काटेकोर काळजी भाजप नेतृत्वाने घेतल्याने सांगण्यात येत आहे.
मुख्यमंत्री शिंदे बुधवारी (ता.२७) दिल्लीत येणार होते. मुख्यमंत्री झाल्यापासून २५ दिवसांत त्यांचा हा सहावा दिल्ली दौरा होता. सूत्रांच्या माहितीनुसार भाजपचे सर्वोच्च नेतृत्व (जे. पी. नड्डा नव्हे) शिंदे यांना वारंवार दिल्लीत का बोलावत आहे, याबाबतच्या चर्चा पंतप्रधान कार्यालयापर्यंत जाताच तेथून काही सूचना गेल्या व २७ तारखेला मध्यरात्री शिंदे यांनीच (शहा यांना भेटण्यास) दिल्लीत यावे, असे कळविण्यात आल्याचे समजते. मात्र रात्रीच्या अंधारातील हा गोपनीय दौरा अधिकृत न ठेवल्याने महाराष्ट्र सदनातील अधिकारी याबाबत काही बोलत नाहीत. शिवसेनेतील एका खासदाराने मात्र ‘त्यांचे मुख्यमंत्री दिल्लीत आले होते,‘ असे सांगितले.
मुख्यमंत्री शिंदे दिल्ली विमानतळावर रात्री साडेआठ वाजता उतरतील व रात्री साडेअकराला त्यांचे परतीचे विमान आहे, असे कळविण्यात आले. त्यानुसार राज्य सरकारच्या दिल्लीतील विभागाने तयारी केली. नवीन महाराष्ट्र सदनातील मुख्यमंत्र्यांचे दालन उघडून साफसफाई करण्यात आली. तेथे सुकामेवा, काही फळे व राज्य सरकारच्या राजशिष्टाचारानुसार अन्य आवश्यक साहित्य ठेवण्यात आले. रात्री पावणेआठच्य सुमारास मुख्यमंत्र्यांचा दौरा रद्द जाल्याची माहिती दिल्लीतील प्रसाशनाला समजली. निवासी आयुक्तांनी मुख्यमंत्री दालन बंद करून घेण्यास सांगितले व ‘डबल ड्यूटी’साठी थांबवून ठेवण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांनाही घरी सोडण्यात आले.
पण मुख्यमंत्री त्याच दिवशी रात्री साडेअकराच्या सुमारास दिल्ली विमानतळावर उतरले. राजशिष्टाचार न घेताच ल्युटियन्स दिल्लीतील एका पंचतारांकित हॉटेलात विश्रांतीसाठी थांबले व काही मिनिटांत शहा यांच्या भेटीसाठी रवाना झाले, अशीही माहिती सूत्रांनी दिली. तेथून त्यांना भाजपने केलेल्या व्यवस्थेतूनच उत्तररात्री पुन्हा विमानतळावर सोडले. मुख्यमंत्र्यांच्या याच दौऱ्यात शहा यांनी त्यांच्या पद्धतीने शिंदे यांना काही गोष्टी स्पष्टपणे सांगितल्याचे कळते.
फडणवीसांचा प्रभाव
मुख्यमंत्री मुंबईत परतल्यावर मंत्रीमंडळ विस्ताराचा प्रश्न मार्गी लागल्याच्या बातम्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांत सुरू झाल्या आहेत. दिल्लीतील भाजप सूत्रांच्या माहितीनुसार उध्दव ठाकरे सरकार पाडण्यासाठी शिंदे यांना साथ देणाऱ्या बंडखोर ४० व दहा अपक्ष आमदारांपैकी बहुतेक जणांना मंत्रिपदाची स्वप्ने पडू लागल्याने विस्ताराचे गाडे अडले. त्यातच शिंदे गटाने काही मलईदार खात्यांसाठी आग्रह धरला होता. ही खाती भाजपकडेच राहायला हवीत, अशी मागणी फडणवीस यांनी शहा यांच्याकडे केली होती. त्यानुसार ‘महत्त्वाची मंत्रिपदे तुमच्याकडे देता येणार नाहीत, पण त्यातील राज्यमंत्रिपदी शिंदे गटातील आमदारांची वर्णी लागू शकते. तथापि त्यासाठीही फडणवीस यांचा होकार आवश्यक असेल, असे शहा यांनी मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेत स्पष्ट केले. सर्वच महत्त्वाची मंत्रालये शिंदे गटाकडे गेल्यास आपल्या ११५ आमदारांना काय द्यायचे, असा मुद्दा फडणवीस यांनी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडे मांडल्याचे समजते.