म्हणून त्याने स्वतःवरच दाखल केली तक्रार

वृत्तसंस्था
सोमवार, 16 जुलै 2018

आपल्या कार्यक्षेत्रामध्ये सुरू असलेली गायींची तस्करी व गोहत्यांना आवर घालण्यात आलेल्या अपयशामुळे पोलिस खात्यातील एका अधिकाऱ्याने स्वतःविरुद्धच तक्रार दाखल केल्याचा अजब प्रकार उत्तर प्रदेशमधील मेरठमध्ये समोर आला आहे. 

मेरठ-  आपल्या कार्यक्षेत्रामध्ये सुरू असलेली गायींची तस्करी व गोहत्यांना आवर घालण्यात आलेल्या अपयशामुळे पोलिस खात्यातील एका अधिकाऱ्याने स्वतःविरुद्धच तक्रार दाखल केल्याचा अजब प्रकार उत्तर प्रदेशमधील मेरठमध्ये समोर आला आहे. 

राजेंद्र त्यागी असे या अधिकाऱ्याचे नाव असून, ते खारखोदा पोलिस ठाण्यात "एसएचओ' पदावर कार्यरत आहेत. आपल्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या छतारी गावात गोहत्या होणार असल्याची माहिती त्यागींना मिळाली होती. त्यानंतर त्यांनी कर्मचाऱ्यांसह तेथे धाव घेतली. मात्र, आरोपी तेथून पळून जाण्यात यशस्वी झाले होते. याबाबत संबंधित बीट अंमलदाराने कोणतीही तक्रार दाखल न केल्यामुळे त्यागी यांनी स्वतःच याची जबाबदारी स्वीकारत स्वतःसह इतर दोन कर्मचाऱ्यांविरुद्ध तक्रार नोंद केली आहे. 

खारखोदा पोलिस ठाण्याच्या पदभार स्वीकारल्यानंतर त्यागी यांनी कर्मचाऱ्यांसाठी काही नियम बनविले होते. बीट अंमलदाराच्या कार्यक्षेत्रात चोरी किंवा खून अशा अन्य घटना घडल्या व आरोपीवर कारवाई करण्यात पोलिसांना अपयश आले तर, त्यासाठी संबंधित बीट अंमलदाराला जबाबदार धरावे. तिथेच एखादा अधिकाऱ्याकडून दुर्लक्ष झाले किंवा एकच चूक दोन-तीनवेळा घडली तर, त्या अधिकाऱ्याविरुद्धही कठोर कारवाई करावी, अशी संकल्पना त्यांनी मांडली. याअंतर्गत त्यागी यांनी आतापर्यंत सहा पोलिस कर्मचाऱ्यांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. 

Web Title: For Failing To Prevent Cow Smuggling Up Cop Registers Complaint Against Himself