इशरतप्रकरणी साक्षीदाराला प्रश्नोत्तराची शिकवण

वृत्तसंस्था
गुरुवार, 16 जून 2016

नवी दिल्ली - इशरत जहॉं प्रकरणाशी संबंधित गहाळ झालेल्या कागदपत्रांची तपासणी करण्यासाठी स्थापन केलेली चौकशी समिती या प्रकरणातील साक्षीदाराला शिकवणी देत असल्याचे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे.

नवी दिल्ली - इशरत जहॉं प्रकरणाशी संबंधित गहाळ झालेल्या कागदपत्रांची तपासणी करण्यासाठी स्थापन केलेली चौकशी समिती या प्रकरणातील साक्षीदाराला शिकवणी देत असल्याचे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे.

2004 मध्ये इशरत जहॉंसह अन्य चार दहशतवाद्यांसोबत चकमक झाली होती. यामध्ये इशरतसह सर्वांना ठार करण्यात आले होते. त्यानंतर अलिकडेच या प्रकरणाशी संबंधित प्रतिज्ञापत्र बदलल्याचा दावा करण्यात आला होता. तसेच या प्रकरणाशी संबंधित कागदपत्रे गहाळ झाली होती. समिती स्थापन करून त्याद्वारे गहाळ कागदपत्रांसंबंधांची चौकशी करण्यात येईल असे आश्‍वासन 10 मार्च रोजी गृहमंत्री राजनाथसिंह यांनी लोकसभेत दिले होते. त्यानंतर केंद्रीय गृह मंत्रालयातील अधिकारी बी. के. प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली. दरम्यान एका इंग्रजी वृत्तपत्राच्या प्रतिनिधीने या प्रसाद यांना 25 एप्रिल रोजी अन्य एका विषयासंबंधी माहिती घेण्यासाठी दूरध्वनी केला होता. दूरध्वनीवर संभाषण सुरू असताना प्रसाद यांना इशरत जहॉं प्रकरणाशी संबंधित साक्षीदार असलेले अधिकारी अशोक कुमार यांचा दुसऱ्या एका मोबाईलवर फोन आला. त्यानंतर त्यांनी पहिला फोन सुरू ठेवत दुसऱ्या फोनवर बोलण्यास सुरुवात केली. "मला हे विचारायचे आहे की हा कागद पाहिला का? त्यावर हा पेपर पाहिला नाही असे तुम्हाला म्हणायचे आहे‘, असे संभाषण त्यांच्यामध्ये झाल्याचा दावा प्रतिनिधीने केला आहे. तसेच हे संपूर्ण संभाषण प्रतिनिधीच्या फोनमध्ये रेकॉर्ड झाल्याचेही वृत्तात म्हटले आहे.

दरम्यान प्रसाद यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. तर "इशरत जहॉं प्रकरणातील प्रतिज्ञापत्रांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार बनावट वाद निर्माण करत आहे‘, अशा प्रतिक्रिया माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी व्यक्त केल्या आहेत.

Web Title: 'Fake controversy' created over Ishrat affidavits: Chidambaram