"फेक न्यूज'बाबतचे पत्रक मागे ; विरोधानंतर पंतप्रधान कार्यालयाकडून हस्तक्षेप 

वृत्तसंस्था
मंगळवार, 3 एप्रिल 2018

चोवीस तासांच्या आत केंद्र सरकारला पत्रक मागे घ्यावे लागले, हा लोकशाहीचा विजय आहे. या पत्रकाच्या माध्यमातून केंद्र सरकार माध्यमांच्या स्वायत्ततेवर अंकुश लावण्याचा प्रयत्न करत होते. सरकारला निर्णय मागे घ्यायला लावल्याबद्दल सर्व पत्रकारांचे अभिनंदन. 

- राधाकृष्ण विखे पाटील, कॉंग्रेस नेते 
 

नवी दिल्ली : पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या सूचनेनंतर खोट्या बातम्यांबाबत (फेक न्यूज) जारी केलेले वादग्रस्त पत्रक माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने आज मागे घेतले. या पत्रकाला मोठ्या प्रमाणात विरोध झाल्याने एकाच दिवसात ते मागे घेण्याची नामुष्की या मंत्रालयावर ओढवली. 

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने काल (ता. 2) एक पत्रक जारी करत खोट्या बातम्यांवर नियंत्रण आणण्याच्या उद्देशाने पत्रकारांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या. त्यानुसार, पत्रकाराने दिलेली बातमी खोटी आढळल्यास अथवा त्यामुळे अफवा पसरत असल्यास त्या पत्रकाराची मान्यता रद्द केली जाणार होती. मात्र, या पत्रकाला विविध ठिकाणांहून प्रचंड विरोध आणि टीका झाल्याने पंतप्रधान कार्यालयाने हस्तक्षेप केला. खोटी बातमी म्हणजे काय, हे ठरविण्याचा अधिकार माध्यमांकडेच असू द्यावा, असे सांगत पत्रक मागे घेण्याची सूचना पंतप्रधान कार्यालयाने मंत्रालयाला केली. या प्रकारामध्ये सरकारने लक्ष घालण्याची गरज नसल्याचे पंतप्रधान कार्यालयाचे मत असल्याचे एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने सांगितले. 

मंत्रालयाने पत्रक जारी केल्यानंतर माध्यमांबरोबरच विरोधी पक्षांनीही सरकारवर टीका केली होती. खोट्या बातम्यांना आळा घालण्याच्या पद्धतीवर कॉंग्रेसने प्रश्‍नचिन्ह उपस्थित करत, सरकारविरोधात बातम्या देण्यापासून पत्रकारांना रोखण्यासाठी ही कृती असल्याची टीका कॉंग्रेस नेते अहमद पटेल यांनी केली होती. 

Web Title: Fake News Order Circulation have been withdrawn by PM Narendra Modi