बांगलादेश सीमेजवळ बनावट नोटा पकडल्या

वृत्तसंस्था
बुधवार, 15 फेब्रुवारी 2017

याआधी पकडण्यात आलेल्या बनावट नोटांच्या तुलनेत यावेळी जप्त करण्यात आलेल्या नोटा या अधिक चांगल्या प्रतीच्या असल्याचे सुरक्षा अधिकाऱ्यांनी म्हटले आहे

कोलकत्ता - भारत बांगलादेश सीमारेषेजवळ सुरक्षा दलाने सुमारे दोन लाख रुये किंमतीच्या बनावट नोटा पकडल्याचे वृत्त आज (बुधवार) सूत्रांनी दिले.

पश्‍चिम बंगाल राज्यातील मालदा जिल्ह्यामध्ये ही घटना घडली. या नोटा बांगलादेश सीमारेषेच्या कुंपणावरुन भारतीय भूभागामध्ये फेकण्यात आल्या होत्या. या नोटा या ठिकाणाहून एका वाहनामधून भारतीय भूभागात नेण्याची योजना आखण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र या ठिकाणी उपस्थित असलेल्या सुरक्षा दलांनी या नोटा तत्परतेने जप्त करण्यात यश मिळविले.

या प्रकरणी उमर फारुक या 21 वर्षीय भारतीय नागरिकास याआधीच अटक करण्यात आली आहे. फारुक याला बनावट नोटांच्या तस्करी केल्याप्रकरणी ताब्यात घेण्यात आले होते. फारुक याची चौकशी केल्यानंतर बनावट नोटांचा हा नवा साठा पकडण्यात आला आहे. याआधी पकडण्यात आलेल्या बनावट नोटांच्या तुलनेत यावेळी जप्त करण्यात आलेल्या नोटा या अधिक चांगल्या प्रतीच्या असल्याचे सुरक्षा अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

Web Title: Fake notes seized along India-Bangladesh border