ईमानच्या बहिणीच्या आरोपात तथ्य नाही : शायना एन. सी.

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 एप्रिल 2017

ईमानच्या प्रकरणाकडे सर्व जगाचे लक्ष लागले होते. ईमानला उपचार मिळत असल्याने जगभरातून उपचारांसाठी मुंबईत येणाऱ्या रुग्णांमध्ये वाढ होईल अशी आशा होती. मात्र, शायमाच्या आरोपांमुळे मेडिकल टुरिझमला धक्का पोहोचेल अशी भीती शायना यांनी आपल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केली.

मुंबई - जगातील सर्वाधिक वजन असलेल्या ईमान अहमदच्या प्रकरणात आता राजकीय शिरकाव होऊ लागला आहे. शायना एन.सी. यांनी ईमानची बहिण शायमा हिने केलेले आरोप तद्दन खोटे असून या प्रकरामुळे महाराष्ट्रातील मेडिकल टुरिझमला धक्का पोहोचण्याची शक्‍यता असल्याचे मत व्यक्त केले.

भाजपाच्या राष्ट्रीय प्रवक्‍त्या शायना यांनी शनिवारी ईमान अहमद हिची भेट घेतली. त्याबरोबर ईमानच्या प्रकृतीबाबत त्यांनी ईमानचे डॉक्‍टर मुफ्फजल लकडावाला यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी मुंबईच्या सैफी रुग्णालय येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ईमानच्या बहिणीने केलेल्या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे वक्तव्य केले. "ज्या ईमानला बिछान्यात हलता येत नव्हते, ती आता कुठल्याही आधारशिवाय बसू शकते. तिला श्वास घेण्यासाठी कृत्रिम ऑक्‍सिजनची गरज भासत नाही. सैफी रुग्णालयातील डॉक्‍टर आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या मेहनतीमुळेच हे शक्‍य झाले आहे. तेव्हा ईमानची बहीण शायमा हिने डॉक्‍टर उपचारांत हलगर्जीपणा करत असल्याचा केलेला आरोप खोटा आहे', असे त्यांनी सांगितले. या प्रकारामुळे केवळ रुग्णालयाचीच नाही तर भारताची आणि येथील वैद्यकीय क्षेत्राची बदनामी होत असल्याचे मत शायना यांनी मांडले. यातून रुग्ण आणि डॉक्‍टर यांच्यातही दरी वाढू शकते अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

शायान यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेवेळी ईमानवर उपचार करणारे बेरिऍट्रीक सर्जन डॉ. मुफ्फजल लकडावाला आणि रुग्णालयातील अन्य कर्मचारी आणि डॉक्‍टर उपस्थित होते. 11 फेब्रुवारीपासून ईमानवर सैफी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या उपचारांवर 3 कोटी रुपयांचा खर्च झाला असून तो खर्च जनतेने दान केलेल्या पैशांतून करण्यात आला आहे. रुग्णालयाने ईमानला सर्व सुविधा देण्याचा प्रयत्न केला आहे. डॉक्‍टरांनी ईमानचे वजन कमी करण्याचे आश्वासन दिले होते. जे त्यांनी करुन दाखवले. सी.टी.स्कॅन चाचणीने हे सिद्ध होतं. तरीही ईमानचे कुटुंबिय तिला उपचार देत नसल्याचा आरोप करणार असतील तर, ते चुकीचे आहे. ईमानला स्वतः भेटले असून तिची प्रकृती उत्तम असल्याचे शायना यांनी सांगितले.

मेडिकल टुरीझमवर परिणाम होणार
ईमानच्या प्रकरणाकडे सर्व जगाचे लक्ष लागले होते. ईमानला उपचार मिळत असल्याने जगभरातून उपचारांसाठी मुंबईत येणाऱ्या रुग्णांमध्ये वाढ होईल अशी आशा होती. मात्र, शायमाच्या आरोपांमुळे मेडिकल टुरिझमला धक्का पोहोचेल अशी भीती शायना यांनी आपल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केली.

रुग्णालयाने ईमानला डिस्चार्ज दिलेला नाही
ईमानचे वजन 329 किलोने कमी करण्यात आले आहे. ती फिट आहे. शायमा यांना वचन दिल्याप्रमाणे ईमानचे वजन कमी करण्यात आले आहे. ईमानच्या सीटी स्कॅनच्या रिपोर्टनुसार तिला येणाऱ्या आकडीला मज्जासंस्थेतील दोष जबाबदार आहे. ज्यावर मी उपचार करुन शकत नाही. काही वैद्यकीय कारणं असतात, ज्याबाबत डॉक्‍टर सांगू शकत नाहीत. त्यानुसार ईमान तिच्या पायावर उभी राहू शकेल की नाही हे आत्ताच सांगणं कठीण आहे. इमानला डिस्चार्ज दिलेला नाही. ती इथे थांबू शकते. इमानच्या बहिणीला तिला इतर रुग्णालयात हलवायचे असल्यास रुग्णालय प्रशासन मदत करेल, अशी माहिती डॉ. मुफ्फजल लकडावाला यांनी दिली.

नर्स झाल्या भावूक
ईमानची संवादाची भाषा वेगळी असली तरी तिच्याशी बोलण्याची कधी अडचण नाही जाणवली. पत्रकार परिषदेवेळी ईमानला उपचार देणाऱ्या नर्स शैली कोशी आणि इतर परिचारिका भावूक झाल्या होत्या. त्यापैकी शैली हिने ईमान सकाळी सहा वाजता उठते तेव्हा तिला गुड मॉर्निंग म्हटल्यानंतर ती प्रतिसाद देते असं सांगितलं. भाषा कळत नसली तरी तिच्या डोळ्याची भाषा समजते. काही दिवसांपूर्वी ईमानला रुग्णालयाच फेरफटका मारला होता, तेव्हा ईमानच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद होता असे कोशी यांनी सांगितले. शायमाने लावलेल्या आरोपांनंतर मात्र ईमान आणि आमच्या नात्यात दुरावा झाला आहे. आता ईमान गुड मॉर्निंग म्हटल्यानंतर तोंड फिरवते. लवकरच ती अबुधाबीला जाणार असल्याचं कानावर आलंय. तिची इतकी सवय झालीय की ती रुग्णालयात नसणार ही कल्पनाच करवत नाही अशी भावना व्यक्त करताना कोशी यांना भावना अनावर झाल्या होत्या.

Web Title: False accusation by Iman's sister : Shaina NC