फरहान अख्तरनेही डिलीट केले फेसबुक अकाऊंट  

वृत्तसंस्था
मंगळवार, 27 मार्च 2018

#DeleteFacebook या हॅशटॅगचा वापर करत फेसबुक अकाऊंट डिलीट करायची चळवळ चालू झाली आहे. यात बरेच सेलिब्रेटी देखील सामील आहेत.

नवी दिल्ली : गेले काही दिवस चालू असणाऱ्या फेसबुकवरील आरोपांमुळे व केंब्रिज अॅनालिटिका या राजकीय विश्लेषक कंपनीने फेसबुकवरून चोरलेल्या माहितीमुळे अनेकांनी फेसबुक अकाऊंट डिलीट केले आहेत. फेसबुकने लोकांचा विश्वास खोटा ठरवला असेही आरोप त्यांच्यावर केले गेले. यामुळे लोकांची फेसबुकवरील विश्वासार्हता कमी झाली आहे. आता अकाऊंट डिलीट करण्यात भारतीय सेलिब्रेटींचा देखील नंबर लागला आहे. 

अभिनेता-दिग्दर्शक फरहान अख्तर याने त्याचे फेसबुकवरील अकाऊंट डिलीट केल्याचे ट्विटरवरून सांगितले. त्याने याचे स्पष्टीकरण दिले नसून, याच फेसबुकच्या प्रकरणामुळे अकाऊंट डिलीट केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्याचे FarhanAkhtarLive page हे तसेच राहणार असून त्यावरून तो संवाद साधू शकेल. 

#DeleteFacebook या हॅशटॅगचा वापर करत फेसबुक अकाऊंट डिलीट करायची चळवळ चालू झाली आहे. यात बरेच सेलिब्रेटी देखील सामील आहेत. व्हॉट्अॅपच्या सहसंस्थापकांनीही मागच्या आठवड्यातच फेसबुक डिलीट करण्याचे आवाहन केले होते. या प्रकरणाच्या पानभर बातम्याही जगभर प्रकाशित केल्या जात आहेत. अमेरिकेच्या निवडणूकांमध्येही या कंपनीने लोकांची वैयक्तिक माहिती फेसबुक वरून चोरल्याचे आरोप केले जात आहेत. याचा निषेध म्हणून अनेक युजर्स आपले फेसबुक अकाऊंट डिलीट करत आहेत.      

Web Title: Farhan akhtar deleted his facebook account