सरकार बॅकफूटवर; आंदोलन सुरुच राहिल, ठाम निर्धारासह शेतकऱ्यांचा पुन्हा ठिय्या

सकाळ वृत्तसेवा
Friday, 29 January 2021

हे आंदोलन गुंडळालं जाईल, अशीच शक्यता वाटत असताना आज मात्र चित्र बदललेलं दिसून येतंय. 

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाला ट्रॅक्टर परेड दरम्यान झालेल्या हिंसेनंतर शेतकरी नेत्यांवर केंद्र सरकारने दबाव वाढवला आहे. हे आंदोलन लवकरात लवकर गुंडाळलं जावं, म्हणून सरकार हरतर्हेने प्रयत्न करताना दिसत आहे. काल गाझीपूर बॉर्डरवर मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. तसेच भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत यांना आंदोलन स्थळ रिकामं करण्यासाठी नोटीस देखील प्रशासनाकडून बजावण्यात आली होती. मात्र, काहीही झालं तरी आम्ही इथून हटणार नाही, असा निर्धार शेतकऱ्यांनी दाखवून दिला होता. काल उशीरा रात्री या संदर्भातील हाय व्होल्टेज ड्रामा पहायला मिळाला. हे आंदोलन गुंडळालं जाईल, अशीच शक्यता वाटत असताना आज मात्र चित्र बदललेलं दिसून येतंय. 

काल रात्री गाझीपूर बॉर्डरला एका छावनीचं स्वरुप आलं होतं. पोलिस आणि रॅपिड ऍक्शन फोर्सची अतिरिक्त टीम तैनात केली गेली होती. मात्र, शेतकरी नेते राकेश टिकैत यांची डोळ्यात अश्रु आणलेली भावनिक साद आणि ठाम निर्धार यामुळे पोलिसांना पुन्हा रात्रीतच मागे हटावं लागलं. सध्या जुजबी प्रमाणात पोलिस तैनात आहेत. गाझीपूरप्रमाणेच टिकरी आणि सिंघू बॉर्डरवरही अशाच प्रकारच्या घडामोडी घडताना दिसून आल्या. याठिकाणचा पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आला होता. त्यामुळे आता पोलीस आंदोलकांवर कारवाई करणार, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत यांनी म्हटलं की, आम्ही आंदोलन स्थळ रिकामं करणार नाही. आम्ही याविषयी सरकारशी बातचित करु. मी लोकांना शांतता राखण्याचं आवाहन करतो. 

गाझीयाबाद जिल्हा प्रशासनाने आंदोलकांना गुरुवारी रात्रीच यूपी गेट रिकामं करण्यासाठी अल्टीमेटम दिला होता. यावेळी मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा फौजफाटा तैनात होता. आंदोलन स्थळावरची वीज कापली गेली  होती. पाण्याचा पुरवाठा खंडीत करण्यात आला होता. एकप्रकारे या परिसराला छावनीचं स्वरुप आलं होतं.
राकेश टिकैत यांनी भावनिक साद घातल्यामुळे रात्रीतच पश्चिम उत्तर प्रदेशच्या भागातून अनेक शेतकऱ्यांनी दिल्लीकडे कूच केली. जवळपास पाच हजारहून अधिक शेतकरी त्यांच्या समर्थनासाठी पोहोचले.

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: farm laws rakesh tikait ghazipur border farmer protest police leaves protest site