farmer protest: शेतकऱ्यांसोबतची दुसरी बैठकही निष्फळ; आंदोलन सुरुच राहणार

सकाळ न्यूज नेटवर्क
Thursday, 3 December 2020

- कृषी कायद्यांविरोधात शेतकरी चांगलेच आक्रमक झाले आहेत.

नवी दिल्ली- कृषी कायद्यांविरोधात शेतकरी चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यातच राजकीय वातावरण तापू लागल्याचं दिसत आहे. तिन्ही कृषी कायदे रद्द करा, अन्यथा दिल्ली ब्लॉक करु असा इशारा शेतकऱ्यांकडून देण्यात आला आहे. दिल्लीच्या सीमेवर शेतकरी ठाण मांडून आहेत. 1 डिसेंबर रोजी शेतकरी प्रतिनिधींची कृषी मंत्र्यांसोबत बैठक झाली. पण, या बैठकीत काहीही तोडगा निघू शकलेला नाही. 3 डिसेंबर रोजी शेतकरी प्रतिनिधी आणि केंद्र सरकारमध्ये पुन्हा चर्चा पार पडत आहे.

लाईव्ह अपडेट

-शेतकऱ्यांसोबतची चर्चा सकारात्मक झाल्याचे कृषीमंत्री म्हणाले आहेत. पण, आजच्याही बैठकीतही कोणता तोडगा निघू शकलेला नाही. 5 डिसेंबर रोजी पुन्हा बैठक होणार आहे. एपीएमसीचे सशक्तीकरण होईल, याबाबत विचार करण्यात येईल, असं नरेंद्र सिंह तोमर म्हणाले. 
 

कृषी सचिवानंतर आता कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर शेतकऱ्यांच्या प्रतिनीधींच्या प्रश्नांना उत्तर देत आहेत. सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये 7 तासांपासून बैठक सुरु आहे. ही बैठक दिल्लीच्या विज्ञान भवनमध्ये होत आहे. बैठकीत नरेंद्र सिंह तोमर यांनी एमएसपी प्रकरणी कोणताही बदल केला जाणार नसल्याचे म्हटलं आहे. 

 

-- विज्ञान भवनच्या बैठकीदरम्यान लंच ब्रेकवेळी शेतकऱ्यांनी जेवण केले. यावेळी शेतकरी प्रतिनिधींनी सरकारने दिलेले जेवण घेण्यास नकार दिला. आम्ही सरकारने दिलेले कोणतेही अन्न स्वीकारणार नाही, आम्ही स्वत:चे जेवण आणले आहे, असं प्रतिनिधी म्हणाले.

 

शिरोमणी अकाली दल प्रमुख आणि राज्यसभा खासदार सुखदेव सिंग धिंडसा यांनी कृषी कायद्यांविरोधात आपला पद्मभूषण पुरस्कार परत करण्याचे जाहीर केले आहे.

 

- पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि अकाली दलाचे वरिष्ठ नेते प्रकाश सिंह बादल यांनी कृषी कायद्यांच्या विरोधात आपला पद्मविभूषण हा सन्मान सरकारला परत केला आहे.मी इतका गरीब आहे की, शेतकऱ्यांसाठी त्याग करण्यासाठी माझ्याकडे आणखी काही नाहीये. मी जो काही आहे तो शेतकऱ्यांमुळेच आहे. अशावेळी जर शेतकऱ्यांचा अपमान होत असेल तर कोणत्याही प्रकारचा सन्मान स्वत: जवळ ठेवण्याचा कसलाही फायदा नाही, असं ते म्हणाले आहेत.

- पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. सरकारने लवकर समस्या सोडवावी, कारण याचा परिणाम अर्थव्यवस्था आणि देशाच्या सुरक्षेवर पडणार आहे, असं ते म्हणाले आहेत.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: farmer protest live update agricultural law farm bill