'भाजपला मत देऊ नका' लिहून शेतकऱ्याची आत्महत्या

वृत्तसंस्था
बुधवार, 10 एप्रिल 2019

'भाजप सरकारने गेल्या पाच वर्षांत शेतकऱ्यांना उद्ध्वस्त केले आहे. त्यांना मत देऊ नका, अन्यथा ते सगळ्यांनाच चहा विकायला लावतील.'

डेहराडून : भारतीय जनता पक्षाला मत देऊ नका, असे चिठ्ठीत लिहून शेतकऱयाने आत्महत्या केल्याची घटना येथे घडली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

ईश्वरचंद शर्मा (वय 60) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱयाचे नाव आहे. कर्जाला कंटाळल्यामुळे शर्मा यांनी विष पिऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी एक चिठ्ठी लिहून ठेवली आहे. यामध्ये त्यांनी भाजप सरकारवर टीका केली आहे. 'भाजप सरकारने गेल्या पाच वर्षांत शेतकऱ्यांना उद्ध्वस्त केले आहे. त्यांना मत देऊ नका, अन्यथा ते सगळ्यांनाच चहा विकायला लावतील' असे या चिठ्ठीत त्यांनी लिहीले आहे. पोलिसांनी संबंधित चिठ्ठी ताब्यात घेतली आहे.

शर्मा यांनी लिहिलेल्या या चिठ्ठीमध्ये दलालाच्या छळाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचाही उल्लेख केला आहे. बँकेतून पाच लाख रुपयांचे कर्ज मिळवण्यासाठी शर्मा यांनी या दलालाची मदत घेतली होती. बँकेतून कर्ज मिळवताना या दलालाने 'हमीदार' म्हणून सही केली होती. यावेळी त्याने शेतकऱ्याकडून एक कोरा चेकही सही करून आपल्याकडे ठेवला होता. बँकेचे कर्ज परतफेड केल्यानंतर याच कोऱ्या चेकचा वापर करत दलाल शेतकऱ्याला ब्लॅकमेल करत होता. त्याने शर्मा यांच्याकडे 4 लाख रुपयांची मागणी केली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

दरम्यान, उत्तराखंडमध्ये गेल्या दोन वर्षांत 17 शेतकऱयांनी आत्महत्या केल्या आहेत. चुकीच्या राजकारणामुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत, अशी टिका काँग्रेसने केली आहे.

Web Title: Farmer suicide note says dont vote for BJP at dehradun