राजधानी दिल्लीत आज शेतकऱ्यांचे शक्तिप्रदर्शन

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 29 नोव्हेंबर 2018

नवी दिल्ली : कर्जमाफी आणि दीडपट एमएसपीच्या मुद्द्यावर देशभरातील शेतकरी संघटनांनी दिल्ली दणाणून सोडण्याची तयारी पूर्ण केली आहे. देशभरातून शेतकरी आंदोलक दिल्लीत दाखल होत असून, उद्या (ता. 29) रामलिला मैदानावरील होणाऱ्या शक्तिप्रदर्शनातून सरकारला जाब विचारणार आहेत. शुक्रवारी (ता. 30) रामलिला मैदानापासून ते संसदेपर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे. 

अखिल भारतीय किसान समन्वय संघर्ष समितीच्या आवाहनानुसार देशभरातील दोनशेहून अधिक शेतकरी संघटनांचे कार्यकर्ते दिल्लीत पोहोचणार आहेत. लाखो शेतकरी येणार असल्याचे समितीच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. यात नजीकच्या उत्तर प्रदेश, हरियाना, राजस्थान, पंजाबसोबतच महाराष्ट्र, तमिळनाडूतील शेतकरी सहभागी होणार आहेत. यासाठी महाराष्ट्रातील मिरजहून, तसेच बंगळूरहून विशेष रेल्वेने शेतकरी संघटनांचे कार्यकर्ते दिल्लीत येणार आहेत. 

रामलिला मैदानावर किसान संसद भरविली जाणार असून, त्यात शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर चर्चा होईल. त्यात संपूर्ण कर्जमुक्ती, शेतमालाला दीडपट किमान आधारभूत मूल्यावर (एमएसपी) चर्चा होणार असून, या मागण्यांची कायदेशीर पूर्तता कशी करता येईल, याबाबतच्या विधेयकाचा मसुदा सरकारला सोपविला जाणार आहे. पीकविमा योजनेवरही शेतकरी संघटनांनी जोरदार आक्षेप नोंदवला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्‍नांची सोडवणूक करण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणीही या वेळी केली जाईल.

सरकारने शेतमालाला दीडपट हमीभाव देण्याची केलेली घोषणा फसवी असून, यासाठी "सी टू' सूत्राऐवजी सरकारने सोईचे "ए टू प्लस एफएल' सूत्र वापरून शेतकऱ्यांच्या डोळ्यांत धूळफेक करणे चालविल्याचे शेतकरी संघटनांचे म्हणणे आहे. 
या आंदोलनात "वन रॅन्क वन पेन्शन'च्या मुद्द्यावर आंदोलन करणाऱ्या माजी सैनिक संघटनाही सहभागी होणार आहेत. 

Web Title: Farmers Demonstrate in Delhi