विदर्भातील शेतकऱ्यांचे आज लाक्षणिक उपोषण

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 18 मे 2017

मोदी सरकारला तीन वर्षे झाली असूनही या आश्‍वासनांच्या पूर्ततेसाठी केंद्र सरकारकडून कोणतेही आदेश आले नसल्याचे सरकारी बॅंकांचे म्हणणे आहे. त्यामुळे दिलेला शब्द पाळावा, ही आठवण करून देण्यासाठी विदर्भातील सुमारे सव्वाशे शेतकरी उद्या जंतर-मंतरवर उपोषण करतील

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या काळात "चाय पे चर्चा' कार्यक्रमातून शेतकऱ्यांना दिलेल्या आश्‍वासनांची पंतप्रधान नरेंद्र मोदींना आठवण करून देण्यासाठी विदर्भातील शेतकरी उद्या दिल्लीत एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करणार आहेत. माजी सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. तीन वर्षे होऊनही एकाही आश्‍वासनाची तड लागली नसल्याचा आरोप मोघे यांनी या वेळी केला.

निवडणूक काळात देशभरात तीन ठिकाणी "चाय पे चर्चा' हा कार्यक्रम झाला. त्यातील एक कार्यक्रम विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील दाभाडी (ता. आर्णी) येथे 20 मार्च 2014ला झाला होता. या कार्यक्रमाचे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे वेगवेगळ्या राज्यांत 1500 ठिकाणी थेट प्रक्षेपण करण्यात आले होते. त्या वेळी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असलेल्या मोदींनी सत्ता मिळाल्यास शेतीमालाला उत्पादनखर्च अधिक पन्नास टक्के नफा, असे किमान आधारभूत मूल्य, अल्पव्याज दराने सुलभ प्रक्रियेद्वारे पीककर्ज, पीकविम्यासाठी कर्ज देणे; तसेच शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षणासाठी अल्पदराने व सरकारी हमीने कर्ज देणे अशा घोषणा केल्या होत्या. मोदी सरकारला तीन वर्षे झाली असूनही या आश्‍वासनांच्या पूर्ततेसाठी केंद्र सरकारकडून कोणतेही आदेश आले नसल्याचे सरकारी बॅंकांचे म्हणणे आहे. त्यामुळे दिलेला शब्द पाळावा, ही आठवण करून देण्यासाठी विदर्भातील सुमारे सव्वाशे शेतकरी उद्या जंतर-मंतरवर उपोषण करतील, असे मोघे यांनी सांगितले. उद्या सायंकाळी पाचला उपोषण सुरू होईल. शुक्रवारी सायंकाळी पाचला उपोषणाची सांगता होईल.

Web Title: Farmers fasting