आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांशी चर्चेस तयार : चौहान

गुरुवार, 8 जून 2017

भोपाळ : कर्जमाफी आणि किमान आधारभूत किमतीसाठी शेतकऱ्यांनी सुरू केलेले आंदोलन हिंसक झाले असताना मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी आज शेतकऱ्यांना चर्चेचे आवाहन केले. वाद मिटविण्यासाठी चर्चा आवश्‍यक असल्याचे सांगत चौहान यांनी शेतकऱ्यांना शांतता राखण्याची विनंती केली.

भोपाळ : कर्जमाफी आणि किमान आधारभूत किमतीसाठी शेतकऱ्यांनी सुरू केलेले आंदोलन हिंसक झाले असताना मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी आज शेतकऱ्यांना चर्चेचे आवाहन केले. वाद मिटविण्यासाठी चर्चा आवश्‍यक असल्याचे सांगत चौहान यांनी शेतकऱ्यांना शांतता राखण्याची विनंती केली.

मुख्यमंत्री चौहान म्हणाले, ''राज्य सरकार चर्चेस तयार आहे. हे सरकार शेतकरी आणि सामान्य जनतेचेच आहे. या सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. दहा जूनपासून तूर आणि उडीद डाळ किमान आधारभूत किमतीनुसार खरेदी करण्यासही सुरवात होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शांतता कायम ठेवावी. चर्चेतूनच मार्ग निघू शकतो.'' काही समाजविरोधी घटक राज्याला अडचणीत आणू इच्छितात, जनता त्यांना धडा शिकवेल, असा दावाही चौहान यांनी केला. नवी दिल्ली येथे पत्रकारांशी बोलताना केंद्रीय मंत्री वेंकय्या नायडू यांनीही या आंदोलनाच्या मागे विरोधकांचा हात असल्याचा आरोप केला. या आंदोलनाला राजकीय रंग देऊन ते चिघळविण्याचा प्रयत्न होत असून, कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी हे केवळ 'छायाचित्र काढून घेण्यासाठी' तेथे गेले आहेत, अशी टीकाही नायडू यांनी केली. शांतता निर्माण करण्यासाठी कॉंग्रेसने अधिक जबाबदारीने वागायला हवे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, संघर्षाचा केंद्रबिंदू ठरलेल्या मंदसोर जिल्ह्यातील संचारबंदी आज थोडी शिथिल करण्यात आली. तरीही शीघ्र कृती दलाच्या दोन तुकड्या येथे तैनात करण्यात आल्या आहेत.

पोलिस गोळीबारातच मृत्यू 
भोपाळ : शेतकरी मृत्यूबाबत केलेल्या प्राथमिक तपासानंतर, पोलिसांनी केलेल्या गोळीबारातच मंगळवारी (ता. 6) पाच शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याचे दिसून येत आहे, असे राज्याचे गृहमंत्री भूपेंद्रसिंह ठाकूर यांनी आज मान्य केले. ठाकूर यांनीच दोन दिवसांपूर्वी गोळबारात शेतकऱ्यांचा मृत्यू झाला नसल्याचे म्हटले होते.