शरद पवार यांनी घेतली मोदी यांची भेट

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 7 जून 2017

लगेच कृतीची अपेक्षा उचित नाही
मोदींबरोबर केलेल्या चर्चेच्या फलिताबाबत विचारणा केली असता पवार म्हणाले, की शेतकऱ्यांच्या समस्या आणि प्रश्‍नांकडे देशाच्या सर्वोच्च पातळीवर लक्ष वेधण्यासाठी आपण ही भेट घेतली होती. त्यावर लगेचच कोणत्या आश्‍वासनाची किंवा कृतीची अपेक्षा करणे उचित नाही. विविध प्रश्‍न त्यांच्यापुढे मांडले आहेत. ते त्याबाबत विचार करतील, असे त्यांनी सांगितले आहे.

नवी दिल्ली : शेतकऱ्यांचे प्रश्‍न, त्यांच्या मागण्या आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या या प्रश्‍नांच्या संदर्भात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी याची आज येथे भेट घेतली. महाराष्ट्रातील वर्तमान शेतकरी आंदोलनावरही दोन्ही नेत्यांनी चर्चा केली. मोदी यांनी या प्रश्‍नांबाबत ठोस आश्‍वासन दिलेले नाही. केवळ विचार करू, असे म्हटले आहे.

महाराष्ट्रातील शेतकरी आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर पवार व मोदी यांची भेट सूचक मानली जाते. या भेटीत महाराष्ट्रासह शेतकऱ्यांच्या विविध प्रश्‍नांवर चर्चा झाल्याचे पवार यांनी सांगितले. महाराष्ट्राच्या शेतकरी आंदोलनाबाबत पवार यांनी मोदी यांना माहिती देताना उत्तर प्रदेशात कर्जमाफीची घोषणा झाल्याने स्वाभाविकपणे त्याची प्रतिक्रिया उमटणे अपेक्षित होते. त्यावर पंतप्रधानांनी उत्तर प्रदेशातील कर्जमाफीमागील भूमिका स्पष्ट केली. उत्तर प्रदेश भाजपने विधानसभा निवडणुकीपूर्वी कर्जमाफीबाबत ठराव केलेला होता आणि उत्तर प्रदेशातील लोकप्रतिनिधी या नात्याने (वाराणसी) आपण त्याला पाठिंबा दिलेला होता. संपूर्ण देशभरातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत आपण कधी बोललो नव्हतो, असे त्यांनी स्पष्ट केल्याचे कळते.

पवार यांनी महाराष्ट्रातही भाजपच्या निवडणूक जाहीरनाम्यात कर्जमाफीचा उल्लेख होता. तसेच भाजपचे एक नेते पाशा पटेल यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत एक यात्रा काढलेली होती, त्यातही कर्जमाफीचा मुद्दाच केंद्रस्थानी होता याकडे मोदी यांचे लक्ष वेधले. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांबाबत गेल्या तीन वर्षांत सोडवणुकीची चिन्हे दिसत नसल्यानेच शेतकऱ्यांकडून हा असंतोष व्यक्त होत आहे, असे पवार यांनी त्यांना सांगितले. मोदी यांनी शेतकरी आपलेच उत्पादन म्हणजे शेतीमालाची अशा पद्धतीने विल्हेवाट लावील यावर विश्‍वास बसत नसल्याची प्रतिक्रियाही व्यक्त केली. त्यावर पवार यांनी नाइलाजास्तव शेतकरी हे करीत असल्याचे त्यांच्या कानावर घातले. 
शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या प्रश्‍नाकडेही पवार यांनी मोदींचे लक्ष वेधले. सर्वोच्च न्यायालयापुढे यासंदर्भात प्रकरण आहे आणि न्यायालयाने केंद्र सरकारकडे शेतकरी आत्महत्यांची आकडेवारी मागितल्यावर केंद्र सरकारने वर्षाला सरासरी बारा हजार आत्महत्या होत असल्याचा अहवाल न्यायालयापुढे सादर केला. या आत्महत्यांमध्ये महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगण या राज्यातील शेतकऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे ही बाब गंभीर असल्याचेही पवार यांनी मोदी यांच्या निदर्शनाला आणून दिले. त्यावर मोदी यांनी त्यांना ही बाब गंभीर आहे आणि सरकार त्याबाबत विचार करीत असल्याचे त्यांना सांगितले. शेतकऱ्यांकडून होणारी कर्जमाफीची मागणी ही या आत्महत्या आणि अन्य शेतीविषयक समस्यांचीच परिणिती असल्याचेही पवार यांनी मोदी यांना सांगितले.

लगेच कृतीची अपेक्षा उचित नाही
मोदींबरोबर केलेल्या चर्चेच्या फलिताबाबत विचारणा केली असता पवार म्हणाले, की शेतकऱ्यांच्या समस्या आणि प्रश्‍नांकडे देशाच्या सर्वोच्च पातळीवर लक्ष वेधण्यासाठी आपण ही भेट घेतली होती. त्यावर लगेचच कोणत्या आश्‍वासनाची किंवा कृतीची अपेक्षा करणे उचित नाही. विविध प्रश्‍न त्यांच्यापुढे मांडले आहेत. ते त्याबाबत विचार करतील, असे त्यांनी सांगितले आहे.

Web Title: farmers strike maharashtra news pune news Sharad Pawar Narendra Modi marathi news sakal esakal